वसाका संरक्षक भिंतींना भगदाड

थकीत वेतनासाठी सेवकांचे अवसायकांना साकडे
वसाका संरक्षक भिंतींना भगदाड

लोहोणेर । वार्ताहर Lohoner

वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातील सुरक्षा यंत्रणेसह स्थानिक सेवकांची उपासमार सुरू आहे. कारखाना मालमत्तेच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला संततधार पावसामुळे जागोजागी भगदाड पडले असून काही ठिकाणी भिंत पडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संततधार पाऊस तसेच काळ्या जमिनीमुळे भिंतीला जागोजागी मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे उंदीर व घुशींचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापूर्वी भिंतीला पडलेले भगदाड जेसीबीच्या सहाय्याने काटे लावून बंद करण्यात आले होते. मात्र पुन्हा 30 ते 40 फूट लांब भिंत पडली आहे.त्यामुळे कारखाना मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सुरक्षारक्षक व सेवकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. सेवकांना त्वरित वेतन अदा करावे,अशी मागणी अवसायक राजेंद्र देशमुख यांच्याकडे वसाका मजदूर युनियन अध्यक्ष अशोक देवरे व कार्याध्यक्ष कुबेर जाधव यांनी केली आहे. या हंगामात वसाका सुरू करावा,असे साकडे युनियनतर्फे अवसायकांना घालण्यात आले आहे.

वसाकाला ज्यांनी जमिनी दिल्या अशा जमीनधारक कामगारांनी अवसायक देशमुख यांची भेट घेऊन थकीत वेतन मिळावे,वसाका सुरू करणेसाठी निवेदन दिले.राज्य शिखर बँकेकडून आजारी कारखान्यांना कर्जपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नजिकच्या काळात वसाका सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com