
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक महानगर हद्दीतील विविध धोकादायक क्रॉसिंग, ब्लॅक स्पॉट तसेच इतर वाहतुकीला अडथळे ठरणारे रस्ते व चौक यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या एका संस्थेमार्फत नाशिक महापालिकेनेदेखील अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांचा अभ्यास पूर्ण झाला असून आज(दि.20) याबाबतचा अहवाल संस्थेच्या वतीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात खासगी बसमधील तेरा व्यक्तींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या अपघाताची स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली होती. त्यानंतर नाशिक महापालिका हद्दीत किती अपघात प्रवण क्षेत्र आहेत याची माहिती घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना पालिका प्रशासनास दिल्या होत्या. त्यानुसार एका खासगी संस्थेकडून शहरातील ब्लॅक स्पॉट आदीचे सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. ते काम पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सूचनेनुसार मनपा आयुक्तांनी शहरातील ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) शोधण्यास सांगितले होते.
अपघातस्थळी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देताच भविष्यात अशा घटना होऊ नये याकरता एका संस्थेकडून सर्वेक्षण सुरू होते. शहरात काही ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र आहे. तसेच जे अपघात क्षेत्र आहे तेथे सिग्नल, डिव्हायडर, गतिरोधक आदी कामे केली जाणार आहेत. तसेच जे ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) निश्चित करण्यात आले आहेत तेथे अतिक्रमण झालेले असेल तर ते हटवले जाणार आहे. प्रारंभी नोटिसा दिल्या जातील, जे कोणी अतिक्रमण काढणार नाही ते पालिका जमीनदोस्त करेल. मिरची हॉटेल परिसरात अतिक्रमण हटवून येथील परिसर मोकळा करण्यात आला आहे. या सिग्नलच्याच पुढे अजून दोन अतिघातक चौक असून तेथेही याच पद्धतीने कामे केली जाणार आहेत.
शहरात असलेल्या ब्लॅकस्पॉटसंबधी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार अंमलबजावणी करून संबंधित परिसरात उपाययोजना केल्या जातील.
- डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त तथा प्रशासक, मनपा