मुसळधारेने शेतकरी सुखावला; खरीप पेरण्यांसाठी लगबग सुरू

मुसळधारेने शेतकरी सुखावला; खरीप पेरण्यांसाठी लगबग सुरू

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शहर-परिसरास आज दुपारी सुमारे एक तास मृग नक्षत्राच्या दमदार पावसाने (rain) अक्षरश: झोडपून काढले असून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. तालुका भागात देखील पावसाची हजेरी लागल्याने शेतकरी (farmers) वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

शहर-परिसरात दुपारी 12 वाजेपर्यंत पावसाचा मागमूस नव्हता. त्यानंतर मात्र अचानक वातावरण बदलून 12.30 च्या सुमारास जोरदार पर्जन्यवृष्टीस (Rainfall) प्रारंभ झाला. सुमारे तासभर कोसळलेल्या पावसाने व्यावसायिक व नागरीकांची त्रेधातिरपीट उडाली. शहरातील सखल भागासह व्यापारी गाळ्यांच्या तळमजल्यात पावसाचे पाणी साचून नुकसान झाले.

कलेक्टरपट्ट्यातील काही भागात भुमीगत गटारींच्या कामासाठी रस्ते (road) खोदल्यामुळे दलदलीचे साम्राज्य पसरून नागरीकांचे दळणवळण विस्कळीत झाले. तासाभराने पावसाने विश्रांती घेतली मात्र दिवसभर अभ्राच्छादित वातावरण व पावसाची रिपरिप सुरूच होती. त्याचा रस्ते वाहतुकीवर परिणाम दिसून आला. शहरातील 45 अंशावर पोहचलेल्या तीव्र तापमानामुळे (Temperature) वाढलेल्या उकाड्यातून पावसाने निर्माण झालेल्या गारव्यामुळे नागरीकांना दिलासा लाभला.

तालुक्यातील दाभाडी, पिंपळगाव, रावळगाव, जळगाव गा., दुंधे, तळवाडे, वडगाव, टेहरे, पाटणे, करंजगव्हाण, कुकाणे, डोंगराळे, झोडगे, अस्ताने, कळवाडी, नरडाणे, निमगाव, येसगाव, मथुरपाडे, चंदनपुरी, सौंदाणे आदी भागातही मृग पावसाची हजेरी लागली आहे. उपरोक्त गावांपैकी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने कांदा व डाळींब पिकांचे नुकसान झाले असून धाबे घरांना गळती लागल्याचे वृत्त आहे. तालुका भागात शेतकरी (farmers) खरीप हंगामासाठी (kharip season) सज्ज झाले असून बहुतांश ठिकाणी पेरणीपुर्व मशागतीची कामे आटोपली आहेत. मृग पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्गाचा उत्साह दुणावला असून पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा मात्र कायम आहे.

नामपूर परिसरात मुसळधार

नामपूर । मोसमखोर्‍यातील नामपूरसह (Nampur) परिसरात आज (दि. 12) दुपारी 2 वाजता मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. चालू वर्षी जून महिना सुरू होऊन सुद्धा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. विहिरी व कुपनलिका कोरड्या झाल्याने अनेक ठिकाणी पिण्याचा पाणीप्रश्न (water issue) जटिल झाला होता. आजच्या मुसळधार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

आता खरीप हंगामातील शेतीकामाना वेग येईल. नामपूर भागात सर्वच शेतकरी बांधवांची जमीन पेरणीयोग्य झाली असून मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, पिकांची पेरणी करण्याच्या बेतात शेतकरी आहे. कृषी खात्याने मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध करून देण्याची मागणी बाजार समिती संचालक आनंदा मोरे, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण सावंत, शेतकरी संघटनेचे दीपक पगार, प्रवीण आंबसनकर, शैलेंद्र कापडणीस, हेमंत ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, पहिल्याच मुसळधार पावसामुळे परिसरातील वीज गायब झाली होती. रस्त्यावर पाणी वाहत असल्यामुळे वाहने चालवणे कठीण झाले होते. एकंदरीत जनजीवन विस्कळीत झाले होते. शेतकरी बांधवांनी मात्र आनंदी व्यक्त करत मृग पावसाचे स्वागत केले.

वीज कोसळून बैल ठार

दहिवड । देवळा तालुक्यातील तिसगाव येथे काल (दि. 11) दुपारी 3 वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी तिसगावच्या निमशेवडी शिवारातील शेतकरी भाऊसाहेब हिरे यांच्या शेतातील घरापासून काही अंतरावर झाडाखाली बांधलेला बैल वीज कोसळून जागीच ठार झाला. त्याच बैलास निवार्‍याला आणण्यासाठी जात असलेला त्यांचा मुलगा गोरख बालंबाल बचावला. उमराणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा डफळ यांनी मृत बैलाचे शवविच्छेदन केले. ऐन पेरणीच्या दिवसात बैल ठार झाल्याने शेतकर्‍यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे

बियाणे खरेदीची लगबग

नांदगाव । गेल्या दोन दिवसापासून नांदगाव तालुक्यात मृग नक्षत्राच्या सरींनी वातावरणातील उष्णता कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे. बळीराजा वरुणराजाच्या आगमनाने सुखावला असून खरीप पेरणीसाठी सज्ज झाला आहे. आज सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. काल पावसाने उघडीप दिल्यानंतर आज नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. शहर व तालुक्यात काही ठिकाणी शनिवारी दुपारी मृग पावसाला प्रारंभ झाला असून एक ते दीड तास पावसाने झोडपून काढले.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. सुमारे तासभर रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाच्या प्रारंभामुळे शेतकर्‍यांची बियाणे खरेदीसाठी बाजारपेठत वर्दळ वाढली आहे. खरीप पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी राजा पावसाची वाट पाहत होता. दोन दिवसापासून झालेल्या पावसाने शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com