मोहदरी घाटात बर्निंग बसचा थरार; चालकाच्या प्रसंगावधाने प्रवासी बचावले

मोहदरी घाटात बर्निंग बसचा थरार; चालकाच्या प्रसंगावधाने प्रवासी बचावले

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

नाशिकहून (Nashik) कोल्हापुरकडे (Kolhapur) निघालेल्या खासगी प्रवासी बसने (bus) नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेट घेतल्याची घटना शुक्रवारी (दि. 13) रात्री 9.30 सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवीत हानी टळली. मात्र, बससह प्रवाशांचे सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

श्रीहरी दत्तात्रय कुलकर्णी (43) रा. म्हसरुळ, नाशिक हे लबैक ट्रॅव्हल्स कंपनीची (Lubbock Travels Company) वातानुकुलीत बस (AC Bus) क्र. एम. एच. 09/ पी. बी. 3069 घेऊन रात्री 8.30 वाजता नाशिक (nashik) येथून कोल्हापुरकडे (Kolhapur) भाविकांना घेऊन निघाले होते. बसमध्ये अंदाजे 30 ते 35 प्रवाशी होते. नाशिकहून निघालेली बस रात्री 9.30 च्या सुमारास मोहदरी घाटात आली असता बसला आग लागल्याचे चालक कुलकर्णी यांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी करुन प्रवाशांना बसमधून उतरण्यास सांगितले. बस स्लिपर कोच (Slipper coach) असल्याने अनेक प्रवासी झोपलेले होते.

अशात हवेच्या वेगामुळे बसची पुढील बाजू पूर्णपणे आगीने वेढली गेली. त्यामुळे प्रवाशांना बसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. हवेमुळे काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. प्रवाशांनी आपला जीव वाचवत बाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला. बसमधील खिडक्यांचे पडदे, कुशन्सने काही क्षणातच पेट घेतल्याने संपूर्ण बससह प्रवाशांचे साहित्य व काहींचे मोबाईलही (mobile) यात जळून खाक झाले. कुलकर्णी यांनी सिन्नर नगर परिषद (sinnar nagar parishad) व एमआयडीसीच्या (MIDC) अग्निशामक दलाला (Fire brigade) व एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर दोन्ही बंब तात्काळ घटनास्थळी पोहचले.

5 वी घटना

उन्हाची तीव्रता वाढल्याने दुचाकी किंवा चारचाकी गाड्यांना आगी लागण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. धावत्या वाहनांना आग लागल्याची महिनाभरातील ही 5 वी घटना आहे. काही दिवसांपूर्वी पांढुर्ली घाटात धावत्या चारचाकीला आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू झाला होता. दुसर्‍याच दिवशी नांदूरशिंगोटे रस्त्यावर (Nandurshingote Road) चारचाकीने पेट घेतल्याने चारचाकी आगीत भस्मसात झाली होती. तर काही दिवसांपूर्वी मोहदरी घाटात कार पेटण्याची व सोमवारी (9) गुरेवाडी शिवारात दुचाकीने पेट घेतल्याने देशवंडी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तर शुक्रवारी (दि.13) रात्री खासगी लक्झरी बस (Luxury bus) पेटली (fire). मात्र, चालकाच्या प्रसंगावधनाने प्रवाशांचा जीव वाचला.

वाहतुक कोंडी

मोहदरी घाट चढताना सुरुवातीच्या वळणावरच बसने पेट घेतल्याने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाल्याचे बघायला मिळाले. संपूर्ण बस आगीच्या भक्षस्थानी पडल्याने आगीचे लोळ पूर्ण महामार्गावर पसरताना दिसून आले. घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार प्रकाश उंबरकर, मिलिंद शिरसाट, चालक खिळे यांच्यासह सेवकांनी मोहदरी घाटात धाव घेऊन रात्री उशिरापर्यंत वाहतूक कोंडी दूर करण्याचे काम केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com