शेतकर्‍यांचा मिरची लागवडीकडे कल

खानगाव नजिकला बाजारपेठेमुळे क्षेत्र वाढले
शेतकर्‍यांचा मिरची लागवडीकडे कल

निफाड । प्रतिनिधी Niphad

द्राक्ष (Grapes), भाजीपाला (vegetable), कांदा (onion) ही पिके आता प्रतिकूल हवामानामुळे (Adverse weather) आणि बाजारभावातील (Market price) बदलामुळे बेभरवशाची वाटू लागल्याने तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी (farmer) पुन्हा एकदा हिरवी मिरची (Green chillies) लागवडीकडे वळतांना दिसत आहे. साहजिकच या परिसरात खानगाव नजिक जवळ मिरची विक्रीची बाजारपेठ तयार झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड (Chilli cultivation) करतांना दिसत आहे.

पालखेड (palkhed) ही पुर्वीच्या काळी मिरची विक्रीची प्रमुख बाजारपेठ बनली होती. घोटी (ghoti), नाशिक (nashik), धुळे (dhule), नंदूरबार (Nandurbar) सह इतर जिल्ह्यातील व्यापारी देखील येथे मिरची खरेदीसाठी येत. गावकुसाला मिरची विक्रीसाठी मोठे पटांगण होते. तेथेच मिरचीची वाहने लोड केली जात असे. साहजिकच मिरचीची लागवड आणि मिरची विक्रीची बाजारपेठ म्हणून पालखेडची ओळख मिरचीचे पालखेड म्हणून तयार झाली ही ओळख अद्यापही कायम आहे.

परंतु नंतरच्या काळात पालखेड, ओझरखेड कालव्यामुळे अवघ्या शिवारात पाणी फिरल्याने शेतकरी नगदी पिकाकडे वळू लागले. साहजिकच परिसरात द्राक्षबागांसह टोमॅटो (tomato), मका, सोयाबीन अन् कांदा पिकाला शेतकर्‍यांची पसंती मिळू लागली. साहजिकच गेली 25 ते 30 वर्ष या परिसरात हीच पीके डोलतांना दिसू लागली. द्राक्षपिकानंतर सर्वाधिक क्षेत्रावर टोमॅटो दिसू लागले. मात्र अलिकडच्या काळात द्राक्ष अन् टोमॅटो शेती बेभरवश्याची वाटू लागल्याने या परिसरातील शेतकरी पुन्हा भाजीपाला पिकाकडे वळू लागले.

त्यातही कमी खर्चात अन् कमी मजुरीत शेतकर्‍यांना पुन्हा मिरचीचा आधार वाटू लागला. हमखास दोन पैसे मिळवून देणारे पीक म्हणून शेतकरी मिरची लागवडीला पसंती देवू लागले. अलिकडच्या दोन-चार वर्षात परिसरातील प्रत्येक गावातील शेतकर्‍यांकडे हिरव्या मिरचीची लागवड होवू लागली. मिरची लागवडीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. तसेच परिसरात सर्वाधिक क्षेत्रावर मिरची लागवड होवू लागल्याने खास मिरची विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीने खानगाव नजिक येथे उपबाजार आवार सुरू केले.

त्यास शेतकरी, व्यापार्‍यांचा देखील चांगला प्रतिसाद मिळू लागला. साहजिकच पालखेड, कुंभारी, शिरवाडे, आहेरगाव, रानवड, सावरगाव, वावी, नांदूरखुर्द, रेडगाव, सारोळेखुर्द, खडकमाळेगाव, वनसगाव आदी शेतकर्‍यांना मिरची विक्रीची जवळची बाजारपेठ मिळाल्याने मिरची लागवड वाढली. फरक एवढाच की पुर्वी पालखेड येथे असणारी बाजारपेठ आता खानगाव नजिक येथे तयार झाली आहे. तसे पाहता या दोन्ही गावातील अंतर फारसे नाही. शेतकरी, व्यापारी वर्गाच्या दृष्टीने हे उपबाजार आवार सोईस्कर झाल्याने येथे मिरची मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येवू लागल्याने त्यातून शेतकर्‍यांना दोन पैसे मिळू लागले आहे. साहजिकच मिरची हेच परिसराचे नगदी पीक बनले आहे.

निफाड तालुक्यात प्रामुख्याने शेतकरी मिरची बियाणात प्रामुख्याने महिकोची नवतेज, सिजेंटाची 5531, व्ही.एन.आर ची नूतन, राशी ची गौरी, नेत्रा ची अ‍ॅस्ट्रॉन या वाणाबरोबरच नंदिता, तेज फोर, वैशाली, लवंगी, मैना, सितार, नंदिनी या वाणांची लागवड करतो.

संदिप निस्ताणे, जिल्हा मॅनेजर (व्ही.एन.आर सीडस् )

कमी पाण्यात भरघोस उत्पादन पुर्वीच्या काळी आमच्याकडे पाण्याची कमतरता होती. त्यामुळे पावसाळ्यातील पाण्याच्या भरवशावर मिरचीची लागवड केल्याने भरघोस उत्पादन मिळत असे. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून या पिकाला पसंती मिळते. द्राक्षे, कांदा, भाजीपाला ही बेभरवश्याची पीके झाली आहे. त्या तुलनेत हिरवी मिरची हे हमखास दोन पैसे मिळवून देणारे पीक असल्याने तसेच या पिकासाठी खर्च देखील कमी येतो. त्यामुळे आमच्या परिसरातील शेतकर्‍यांना मिरची हाच आधार वाटू लागला आहे. त्यामुळेच आम्ही दरवर्षी हिरवी मिरची पीक घेण्याला पसंती देतो. आता मिरची विक्रीची जवळची बाजारपेठ झाल्याने मिरचीचे उत्पादन देखील वाढू लागले आहे.

मयूर भोसले, शेतकरी (सारोळेखुर्द)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com