कसबे सुकेणेचे तापमान 42 अंशांवर

कसबे सुकेणेचे तापमान 42 अंशांवर

कसबे सुकेणे । वार्ताहर Kasbe Sukene

गेल्या चार-पाच दिवसांपासून कसबे सुकेणे व परिसराचे तापमान 42 अंशाच्या पुढे गेले असून जास्तीत जास्त तापमानाची नोंद 44.5 इतकी शेतकर्‍यांच्या द्राक्षबागेत नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात प्रथमच सूर्य कोपला आहे.

कसबे सुकेणे व परिसर विदर्भापेक्षाही उष्ण झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सकाळी नऊच्या सुमारास तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. दुपारी तीनपर्यंत तापमान कमाल मर्यादेपर्यंत जाऊन पोहोचत असून, सायंकाळी साडेपाचपर्यंत तापमानाचा सरासरी पारा दिसून येत असून, त्यानंतर तापमान काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होते. रात्रीच्या वेळीही तापमान फारसे कमी होत नसल्याने उकड्याचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत आहे.

वाढत्या तापमानामुळे दिवसभरातील शेतीची सर्व कामे ठप्प झाली असून शेतात काम करणे मजुरांसह बळीराजाला जिकरीचे बनले आहे. याशिवाय सध्या लग्नसराई मोठ्या प्रमाणात असून वाढत्या तापमानाचा परिणाम लग्नसराईवर दिसून येत आहे. जवळच्या लग्नातही जाणे नागरिकांकडून टाळले जात असून अत्यावश्यक ठिकाणी जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागत आहे. वाढत्या तापमानामुळे थंड पेय, ज्यूस, ऊसाचा रस अशा पेयांना मोठी मागणी वाढली असून वाढत जाणारे तापमान धोक्याची घंटा ठरत आहे.

द्राक्षबागांना फटका

एप्रिल मे महिन्यातील द्राक्षबागांची खरड छाटणी जवळपास पूर्ण झाली असून काही द्राक्षबागा फुटण्याच्या स्थितीत आहे. तर काही द्राक्षबागा सबकेन स्थितीत आल्या आहेत. मात्र, वाढत्या तापमानामुळे द्राक्ष काडीमध्ये गर्भधारणा होण्यास अडचणी येणार असून, शेतकर्‍यांना त्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. योग्य त्या औषधांची फवारणी करावी लागणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

सध्या कसबे सुकेणे व परिसराचे तापमान प्रचंड प्रमाणात वाढले असून, या तापमानाचा परिणाम द्राक्ष काडीच्या गर्भधारणा क्षमतेवर होणार आहे. शेतकर्‍यांनी योग्य ती काळजी घ्यावी. द्राक्षबागांना ठिबकद्वारे मुबलक प्रमाणात पाणी द्यावे.

रामेश्वर काठे,द्राक्ष उत्पादक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com