चटणी-भाकरीची लज्जत

चटणी-भाकरीची लज्जत

मालेगाव | सतीश कलंत्री Malegaon

अनेकदा ग्रामीण भागात ( Rural Area ) जाण्याचा योग येतो. तसंही ग्रामीण भागातील मंडळी खूप प्रेम करतात. घरात जे उपलब्ध असेल ते खाऊ घालतात. महागड्या वस्तू घरात नसल्या तरी घरात एक प्रकारचं प्रसन्न वातावरण असतं.

असंच एके दिवशी कार्यक्रमाचं बोलावणं आलं. दुपारचा कार्यक्रम होता. खेड्यातली मंडळी हळूहळू जमते. आधी काही वक्ते बोलले नंतर माझा नंबर आला. साधारणतः अर्धा तास बोलून मी माझं भाषण थांबविलं. आता संयोजकांकडून काहीतरी पाहुणचार करून घेण्याची गळ घालण्यात आली. शहरात रहाणारी मंडळी शक्यतो ग्रामीण भागातील पाहुणचार टाळतात.

चहा-पाणी घेवूनच जा असा आग्रह होवू लागला. खरं तर जेवणाची वेळ झाली होती. मलाही भूक लागली होती. भाऊ जेवतील का विचारून तर बघा... कुणीतरी बोललं. अरे ही मोठी माणसं आपल्याकडे कशाला जेवतील? असं काहीसं अस्पष्ट मी ऐकलं. त्यांचा हा भ्रम मला खोडून काढायचा होता. मीच पुढं होवून बोललो, मला जेवायचं आहे. हे ऐकुन सारे स्तब्ध झाले. तसं एक जण पुढे येवून म्हणाला, भाऊंना मी माझ्या घरी घेवून जातो. मीही तयार होतोच.

अजुन दोन-तीन माणसं सोबत आली. लहानसं घर होतं. अचानक पाहुणे आलेले पाहून घरचे थोडे भांबावले. घरातील कर्त्या पुरूषाने स्वयंपाक काय आहे, ह्याची विचारणा केली. फक्त चटणी-भाकर असल्याचं सांगितलं गेलं. सगळे मग एकमेकांकडे पाहू लागले. मी म्हणालो, अहो चालेल की चटणी-भाकर. मग खाली चटई अंथरल्या. मी हळूच म्हटलं मीरचीचा ठेचा मिळेल का? घरातल्या महिलेने लागलीच पदर खोचला अन् मिरचीचा ठेचा बनवू लागली.

अवघ्या पाच मिनिटात ठेचा बनून तयार झाला. एकीकडे गरमागरम भाकरी ( Bhakri / Bread )बनत होत्या. मी मात्र आग्रहाने शिळ्या भाकरीची मागणी केली, तसे सारेच चमकले. पाहुण्यांना शिळी भाकर कशी द्यायची? असा विचार करित नाही म्हणू लागले. पण मी आग्रहच धरला. छानपैकी जेवण झालं. मी घरातल्या महिलेंचे छान जेवण दिल्याबद्दल आभार मानले. मला हे जेवण पंचपक्वान्नापेक्षाही गोड वाटले. शहरातली माणसं सहसा ग्रामीण भागातील घरी जेवण करत नाहीत.

ह्या गोष्टीला मला छेद द्यायचा होता. मनापासून व आनंदानं त्यांनी पाहुणचार केला होता. ह्या जेवणात ओतप्रोत प्रेम भरलेले होते. त्या प्रेमामुळे हे जेवण पंचपक्वान्नापेक्षा जास्त गोड बनले होते. ह्यात कुठलाही बडेजावपणा नव्हता की कोणताही दिखावूपणा नव्हता. ह्यात प्रत्येक कणात जिव्हाळा व आदर भरलेला होता अन् अशा छान चटणी-भाकरीचा मी मनमुराद आनंद लुटला होता. ही चव अजुनही जेव्हा आठवते तेव्हा परत कुणीतरी चटणी-भाकर खाण्यासाठी कधी बोलवणार? ह्याची वाट पहातोय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com