
सातपूर । प्रतिनिधी Satpur
आरोग्य व शिक्षणाच्या माध्यमातून देशाला समृद्धीकडे नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम या प्रकल्पातून केला असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून 25 कोटी रुपये खर्चाच्या महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या दुसरे मजल्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी नगरसेविका लता पाटील, अमोल पाटील, मंडळ अध्यक्ष भगवान काकड, माजी स्थायी सभापती गणेश गीते, देवीदास राठोड, रामहरी संभेराव, रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोरकर, वर्षा भालेराव, दीपक मौले, नीलेश भंदूरे, संदीप तांबे, संजय राऊत आदिंसह पदाधिकारी होते.
दिनकर पाटील यांनी प्रास्ताविकात प्रभागात व नाशिक विभागात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा सादर केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनता 80 हून जास्त प्रतिनिधी निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी नृत्य व नंदेश उमप व सहकारी यांच्या देशभक्तिपर व भावगीतांच्या कार्यक्रमांनी करण्यात आली.