स्वॅब घेणाराच निघाला बाधित

स्वॅब घेणाराच निघाला बाधित
करोना बाधित

सिन्नर । विलास पाटील Sinnar

सिन्नर तालुक्यात सोमवारी (दि.२०) विक्रमी ६३ रुग्ण ‘करोना’ बाधीत आढळल्यानंतर याच रुग्णांमध्ये उपजिल्हा रुग्णालयात संशयितांचे स्वॅब घेणारा तरुणही ‘करोना’ बाधीत असल्याचा अहवाल आल्याने आरोग्य विभागाला धक्का बसला आहे.

स्वॅब घेण्यासाठी कॉन्ट्रैक्टवर तीन सेवक पुरवण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालयात शहरातील संशयितांचे स्वॅब घेण्याचे काम एक तरुण करतो तर दोघे रतन इंडियाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्यांचे स्वॅब घेतात. सोमवारी आलेल्या विक्रमी अहवालांमध्ये उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेणाऱ्या तरुणालाच ‘करोना’चा संसर्ग झाल्याचा अहवाल आला.

शहरात रात्री ३३ रुग्ण पॉझीटीव्ह निघाले होते. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा स्वॅब घेण्याचे काम माणूसच नसल्याने आज (दि.२१) दिवसभर ठप्प होते. ३१ वर्षीय हा युवक उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्याचे काम करतो. आरोग्य विभागाकडूनच राहण्यासाठी त्याला स्वतंत्र रुम देण्यात आली आहे. आवश्यक ती सर्व काळजी घेतल्यानंतरही या तरुणाला ‘करोना’चा संसर्ग झाल्याने आरोग्य विभाग बुचकळ्यात पडला आहे.

उपजिल्हा रुग्णालयाकडून तातडीने दुसरा माणूस मिळावा यासाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार सुरु होता. रतन इंडियाच्या कॅम्पमध्ये ग्रामीण भागातील संशयितांचे स्वॅब घेण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. सायंकाळपर्यंत ३४ संशयितांचे स्वॅब तेथे घेण्यात आल्याचे समजते. मात्र, शहरातून आज एकही स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

दरम्यान, संशयिताला ‘करोना’चा संसर्ग आहे की नाही हे शोधणारी अँटीजेन रॅपीड टेस्ट करण्यासाठी शासनाने अजून उपजिल्हा रुग्णालयाला पासवर्ड नंबर दिला नसल्याने हे कामही रेंगाळले आहे. हा पासवर्ड आला तर अवघ्या दोन तासात संशयिताचा अहवाल मिळणे शक्य होणार आहे.

तालुक्यात आज ६ रुग्ण वाढले

तालुक्यातील बारागांव पिंपरी येथे ५५ वर्षीय महिला, मनेगाव येथे 8 वर्षीय मुलगा,

वावीत २ वर्षाची चिमुरडी व २९ वर्षीय महिला पॉजिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे.

सिन्नर शहरातील संजीवनी नगरमधे ३७ वर्षीय व नायगाव रोडवरील साईं दत्त नगरमधील ३१ वर्षीय पुरुष पॉजिटिव्ह असल्याचा खाजगी लॅबचा अहवाल आला आहे.

१७ रुग्ण परतले घरी

उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेले १७ रुग्ण बरे झाल्याने आज घरी परतले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com