महागाई विरोधात रस्त्यावर चुली पेटविल्या

काँग्रेस महिला आघाडीचे आंदोलन; मोदी सरकारमुळे गरीब जनता उपाशी : महापौर
महागाई विरोधात रस्त्यावर चुली पेटविल्या

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

पेट्रोल( Petrol ), डिझेल( Diesel ) व गॅस सिलेंडरच्या( LPG Gas cylinders ) वाढत्या दरामुळे महागाईचा भडका उडाल्याने काँग्रेसच्या( Congress ) महिला आघाडीने सरकार विरोधात रस्त्यावर चुली पेटवित महागाई विरोधात मालेगाव येथे आंदोलन केले.

काँग्रेसच्या महिला नेत्या महापौर ताहेरा शेख ( Mayor Tahera Shaikh ) यांनी येथे बोलतांना सांगितले की, महिला वर्ग महागाईत अक्षरश: होरपळून निघत आहे. परंतू मन की बात करणार्‍या पंतप्रधान मोदींना चुलीचा धूर व महिलांचे अश्रू आता दिसत नाही. या इंधन दरवाढीने चुलीवर स्वयंपाक करणे देखील आता महिलांना अशक्य बनू लागले आहे. मोदी सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे गोरगरीब जनतेस उपाशी झोपण्याची वेळ आली असल्याची घणाघाती टिका त्यांनी केली.

महानगर-जिल्हा काँग्रेसतर्फे महापौर ताहेरा शेख यांच्या नेतृत्वाखाली आज पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयावर शेकडो महिलांनी रस्त्यावर चुली पेटवून स्वयंपाक करत आपला असंतोष व्यक्त केला. यावेळी जनता करे हाहाकार, पेट्रोल-डिझेल शंभर के पार, अच्छे दिन कब आयेंगे मोदी जब घर जायेंगे, इंधन दरवाढ कमी करा आदी घोषणा देत महिलांनी प्रांत कार्यालय परिसर दणाणून सोडला होता. यावेळी महापौर ताहेरा शेख यांच्यासह अनेक नगरसेविका व महिलांनी रस्त्यावर चुली पेटवून स्वयंपाक करत तेथेच लहान मुलांना जेवण खावू घातले.

इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने कुटूंबाचा गाडा हाकायचा कसा? असा बिकट प्रश्न महिलांपुढे उपस्थित झाला आहे. गोरगरीब कामगारांच्या घरात गॅस तर सोडा चुली पेटणे देखील मुश्कीलीचे बनले असल्याचे महिला अक्षरश: हवालदिल झाल्या असल्याने आज त्या आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर येवून स्वयंपाक करीत असल्याचे स्पष्ट करीत महापौर ताहेरा शेख यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिकेची तोफ डागली.

अर्थचक्र पुर्णत: कोलमडून गेले आहे. करोनामुळे अगोदरच अनेकांवर आर्थिक गडांतर आले असतांना दोनशेपर्यंत पोहचलेले खाद्यतेल तसेच इतर जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीमध्ये झालेली वाढ यामुळे महिला वर्ग अक्षरश: त्रस्त झाला आहे. गॅस सिलेंडर घेणे परवडत नसल्याने घराघरातून चुलीचा धूर पुन्हा निघू लागला आहे. मोदी सरकारने जनतेचे विशेषत: महिलांचे जगणे कठीण केले आहे. त्यामुळे आज रस्त्यावर बसून चुलीवर स्वयंपाक करत आपला निषेध महिला व्यक्त करत आहेत. महागाई कमी न झाल्यास हजारो महिलांसह अधिक तीव्र आंदोलन पुन्हा छेडले जाईल, असा इशारा महापौर ताहेरा शेख यांनी शेवटी बोलतांना दिला.

यावेळी माजी आ. शेख रशीद यांनी केंद्रातील मोदी सरकारविरूध्द आपल्या भाषणात टिका केली. पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंवर कराच्या माध्यमातून लाखो-कोटी रूपये नफा मिळून सर्वसामान्य जनतेला मात्र मोदी सरकारने महागाईच्या खाईत लोटले आहे. अच्छे दिनाचे फसवे स्वप्न दाखविणार्‍यांना आता जनताच धडा शिकवेल, असा इशारा शेख रशीद यांनी शेवटी बोलतांना दिला. यावेळी प्रांत विजयानंद शर्मा यांनी आंदोलनकर्त्या महिलांतर्फे निवेदन स्विकारले. या आंदोलनात नगरसेविका हमीदा शेख, कमरून्निसा शेख रिजवान, नगरसेवक फारूक कुरेशी, जफर अहमद, निहाल हाजी, इस्त्राईल कुरेशी, असलम अन्सारी, जाकीर शेख, तरबेज अहमद, हाफिज अन्सारी, अब्दुल करीम, सलीम शेख आदींसह मोठ्या संख्येने महिला व काँग्रेस पदाधिकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com