प्रशिक्षणावरील स्थगिती उठवली

ST Bus
ST Bus

नाशिक । प्रतिनिधी

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक काटकसर व उपलब्ध सेवकांचा पर्याप्त वापर करण्याच्या हेतूने सन 2016-17 व 2019 अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. या सर्व उमेदवारांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर खंडित झाले होते तेथून पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. त्यानुसार यासंदर्भातील परिपत्रक संबंधित विभागांना माधव काळे (महाव्यवस्थापक, सेवकवर्ग) यांनी जारी केले आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशावेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने सन 2016-17 व 2019 अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील सुमारे 3116 प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती.

यामध्ये 2846 पुरुष, चालक तथा वाहक, 161 महिला, चालक तथा वाहक, दोन पर्यवेक्षक व 107 अधिकार्‍यांचा समावेश होता. सद्यस्थितीला एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील प्रवासी गर्दीचा हंगाम विचारात घेता उपरोक्त निवड झालेल्या सर्व सेवक / अधिकार्‍यांचे प्रशिक्षण ज्या टप्प्यावर थांबले होते त्या टप्प्यापासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे. महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com