आरोग्य विभागाच्या खरेदीवरून स्थायीची सभा गाजली

आरोग्य विभागाच्या खरेदीवरून स्थायीची सभा गाजली
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मनपाच्या दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या दुरूस्तीचा ठेका तसेच आरोग्य विभागासाठी नव्याने खरेदीसाठी 80 लाख रुपयांच्या विषयावरुन स्थायी समितीची सभा ( NMC-Standing Committee Meeting ) गाजली. दोन्ही प्रस्तावांना विरोध झाल्याने सभापती गणेश गिते यांनी हे विषय तहकूब करुन पुढच्या बैठकीत सविस्तर सादर करण्याचे आदेश दिले.

मनपाची स्थायी समितीची मासिक सभा राजीव गांधी भवन येथील सभागृहात सभापती गणेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने झाली. यावेळी दोन विषय सोडून विषय पत्रिकेवरील इतर विषयांना मंजुरी मिळाली, तर काही जादा विषय देखील घेण्यात आले.

मुंबई नाका भागात असलेल्या महापालिकेच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह व वाहनतळ आवार येथील साफसफाईचे काम विश्वकर्मा स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांचेकडून करून घेण्यात आल्याने त्या कामी 56 लाख 15 हजार 913 रुपयाचा खर्च कार्यतर मंजुरी देण्याबाबतचा विषय बैठकीत घेण्यात आला. मात्र हा विषय अगोदरच महासभेने फेटाळला असल्याचा मुद्दा शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित करून याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. तसेच नगरसचिव राजू कुटे यांच्याकडून सविस्तर माहिती मिळावी, असे सांगितले.

प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सभापती गिते यांनी सदरचा विषय तहकूब ठेवला. त्याचप्रमाणे नाशिक महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कोविड 19 साठी आवश्यक असलेल्या डिस्पोजेबल, सर्जिकल साहित्य न्यूनतम दराने सन 2021- 23 करिता 80 लाख रुपये किमती पर्यंतचे डिस्पोजेबल सर्जिकल साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यावर काँग्रेसचे राहुल दिवे यांनी आपण कोणते साहित्य कोणत्या दराने घेतो याबाबतची माहिती प्रस्तावात जोडण्यात आलेली नसल्याचे सांगत हा विषय तहकूब ठेवण्याची मागणी केली.

आरोग्य विभागाला आवश्यक त्या सर्व गोष्टी त्यांनी घ्याव्यात, आमचा विरोध नाही, मात्र सभागृहाला माहिती मिळाली पाहिजे असे आमचे म्हणने असल्याचे दिवे यांनी सांगितले.

लसीकरणाचा मुद्दा

स्थायी समितीच्या बैठकीत भारतीय जनता पक्षाचे मुकेश शहाणे यांनी लसीकरणचा मुद्दा उपस्थित करून आपल्याला किती लस मिळतात व त्याचे वाटप कसे होते, याबाबत माहिती मागितली. त्यानुसार प्रशासनाने शहरात केंद्रात वाढ झाल्याचे सांगत 129 केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू असल्याची माहिती दिली. पंचवटीत 25, नाशिक रोड 21, सातपूरला 16, पूर्व विभागात 19, पश्चिम विभागात 17 तर नवीन नाशिक विभागात 24 केंद्रांवर लस देण्यात येत असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.

आपल्याला ज्या प्रमाणे लसीचा पुरवठा होतो त्याचे समान वाटप करण्यात येते. असे सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या समिना मेमन यांनी देखील केंद्र तसेच राज्य सरकारकडे आपण सर्वांनी एकत्रितरीत्या लसीची मागणी करावी, जेणेकरून नाशिकला अधिक संख्येने अधिक लस प्राप्त होईल व आपण अधिक गतीने लोकाना लस देऊ. त्याच प्रमाणे मेमन यांनी मुल्तानपुरा हॉस्पिटलच्या मुद्दा देखील उपस्थित केला तसेच त्याचे विद्युत बिल भरून त्वरित हॉस्पिटल सुरू करावे अशी मागणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com