नाशिक । प्रतिनिधी Nashik / Dindori / Pimpri-Aanchal

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे जनक असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील पिंपरीआंचलगावी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले असून लवकरच या प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मितीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली.

या प्रकल्पातुन रोज सुमारे 3 मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे गावातील शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा होणार असून त्यांची विजेअभावी होणारी परवड थांबणार आहे. सध्या लासलगाव, वणी या ठिकाणी हे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू असून आता पिंपरीआंचल व निगडोळ येथे नवीन प्रकल्प कार्यान्वित होत आहेत.

केंद्र सरकारच्या अख्यारीतीत विज कंपन्यांच्या संलग्न असणार्या इसीएल कंपनी या प्रकल्पाची देखरेख करणार असून यांच्या माध्यमातून या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज चालणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जेवर अधिकाधिक भर दिला असून भविष्यात देशाला लागणारी अधिकची वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करण्यावर भर देणार आहे, असे प्रकल्प दिंडोरी लोकसभा मतदार संघातील अनेक गावांमध्ये राबविणार असल्याचे खा. डॉ. भारती पवार यांनी सांगितले.