दुकानावर बुलडोझर चालवले; ग्रामसेवकास निलंबित करा

दुकानावर बुलडोझर चालवले; ग्रामसेवकास निलंबित करा

तालुका नाभिक संघटनेची गटविकास अधिकार्‍यांकडे मागणी

मालेगाव । प्रतिनिधी

गावठान जमिनीवर गत चार दशकांपासून असलेल्या दुकानांचा वाद न्यायप्रविष्ट तसेच जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे दिवाणी न्यायालयाचे आदेश असताना काही ग्रा. पं. सदस्यांना हाताशी धरून सदरचे दुकान जमीनदोस्त करणार्‍या ग्रामसेवकास निलंबित करावे, दुकानांच्या नासधूस प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी व या गैरप्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शहर-तालुका नाभिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांना मालेगाव शहर-तालुका नाभिक संघटनेतर्फे निवेदन देण्यात येवून पाटणे ग्रामसेवक रमेश द्यानद्यान यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाटणे येथील नाभिक समाजाचे कारागीर कमलाकर शामराव हिरे वडिलोपार्जित सलून व्यवसाय लोखंडी छताच्या दुकानात सुमारे 40 वर्षांपासून ग्रामपंचायतच्या जागेवर सामान्य कर पावती भरणा करून करीत होते.

व्यवसायाला लागणारे सर्व साहित्य या दुकानात होते. दुकान जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना देखील ग्रामविकास अधिकारी द्यानद्यान यांनी जेसीबीच्या सहाय्याने सदर दुकान जमीनदोस्त केले.

न्यायालयाचे अतिक्रमण स्थगित आदेश संबंधित अधिकार्‍यांना दाखवून ही त्यांनी तो फाडला व त्या आदेशाचा अवमान करून कोणतीही विनंतीला न जुमानता हिरे यांचे सलून दुकानावर हातोडा मारला. लॉकडाऊनमध्ये शासन रोजगार निर्माण करत असून उपजीविकेसाठी विविध योजना राबवत असताना शासनाचा एक प्रतिनिधी एखाद्या कुटुंबावर अशी वेळ, काळ न बघता कार्यवाही कशी करू शकतो संबंधित अतिक्रमण काढण्यामागे काय कारण होते त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

उपोषणाचा इशारा

हिरे यांच्या कुटुंबात वयोवृद्ध आई-वडील, पत्नी, लहान मुले असून चरितार्थ चालविण्याचे दुसरे साधन नाही. सदर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होऊन सदर कुटुंबाची नुकसान भरपाई सह पुनर्वसन होऊन संबंधितांवर कार्यवाही व्हावी. सदर कुटुंबाला न्याय न मिळाल्यास नाभिक संघटनेच्या वतीने पीडित कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com