राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिरतेने काम करेल- आठवले

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिरतेने काम करेल- आठवले

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवारांबरोबर असतांना आलेला अनुभव लक्षात घेत आपण त्यांची साथ सोडली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाऊ नका असा सल्ला दिला होता. मात्र त्यांनी न मानता राष्ट्रवादीबरोबर गेल्याने अखेर ठाकरे यांना धोका झालाच.

ठाकरेंना चाळीस आमदार सांभाळता आले नाही, मात्र याचे खापर आता दुसर्‍यांवर फोडत खोके-खोके असा आरोप करीत सुटले आहेत. मात्र कितीही आरोप केले खालच्या स्तरावर टीका केली तरी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार मजबूत असून आगामी दीड वर्षे हे सरकार स्थिरतेने काम करेल, असा घणाघात रिपाइंंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी येथे बोलतांना केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे आज मालेगाव दौर्‍यावर आले असतांना येथील स्वप्नपरी लॉन्समध्ये आयोजित जाहीर सभेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

जिल्हाध्यक्ष भारत जगताप सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री दादा भुसे, खा.डॉ. सुभाष भामरे, रमेश मकासरे, चंद्रशेखर कांबळे, शितलाताई गांगुर्डे, मनाली जाधव, प्रकाश लोंढे, संजय भालेराव, अमोल पगारे, दिलीप अहिरे, विकास केदारे, शितल खैरनार, दादाजी महाले, दादाजी शेजवळ, सुदेश वाघ, बाळू बिर्‍हाडे, रतीलाल पवार, रवी पगारे, सुनिल यशोद आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये कारण डॉ.आंबेडकर यांच्यापासून राष्ट्रवाद आमच्या नसानसात भिनला आहे. राजकारणापुरता राष्ट्रवाद मानणारे आम्ही नाहीत अशी टीका केली.

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांच्यातर्फे होत असलेल्या टिकेचा आठवले यांनी आपल्या शैलीत खरपूस समाचार घेतला. खोके-खोके बोलण्यातच ते धन्यता मानत आहे. कारण त्यांचे डोके फिरले आहे. भाजपबरोबर युती करून निवडून यायचे व नंतर सत्तेसाठी युती तोडण्याचे काम ठाकरे यांनी केले. चुकीचा निर्णय घेतल्यामुळेच 40 आमदार गेले इतकेच नव्हे शिवसेना नाव व धनुष्यबाण देखील गेले, असे आठवले म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष भारत जगताप, प्रकाश लोंढे, तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे, दादाजी महाले आदींची भाषणे झालीत. यावेळी खा. आठवलेंसह पालकमंत्री दादा भुसे, खा.डॉ. सुभाष भामरे यांचा नागरी सत्कार रिपाइं पदाधिकार्‍यांतर्फे करण्यात आला. यावेळी महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी ठरली.

लोकसभा शिर्डीतून लढवणार

नाशिक । प्रतिनिधी

आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत रिपब्लिकन पक्षही एकत्र राहणार असून येत्या मंंत्रिमंडळ विस्तारात पक्षाला एक मंत्रिपद मिळावे, भविष्यात रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढवण्यासाठी तीन लोकसभेच्या जागा द्याव्यात, एक विधान परिषद सदस्यत्व मिळावे, दोन ते तीन महामंडळाचे अध्यक्ष व इतर महामंडळात सदस्यत्व मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

आगामी काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करणार असल्याचे सूतोवाचही केले येत्या 28 मे रोजी शिर्डीत पक्षाचे अधिवेशन होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना बोलावणार आहे. व्यापक पक्षबांधणीचा उद्देशही आठवले यांनी व्यक्त केला.

आता रिपब्लिकन पक्ष सर्व जातीधर्माचा व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे. नागालॅण्डला ज्याप्रमाणे पक्षाची बांधणी भक्कम झाली तसाच प्रयत्न येथे केला जाणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी प्रकाश विश्वनाथ काळे, पवन क्षीरसागर, अनिल गांगुर्डे, नारायण गायकवाड उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com