शाळेचा कुतूहल कोपरा आणि शब्दांजली
नाशिक

शाळेचा कुतूहल कोपरा आणि शब्दांजली

सृजन आनंद शाळा घेणार ऑगस्टमध्ये चाचणी

Abhay Puntambekar

नाशिक । वैशाली शहाणे ( सोनार) Nashik

लांबलेल्या सुट्टीच्या या काळात आमची शाळा मुलांकडून घरबसल्या अभ्यासाची पूर्वतयारी करून घेत आहे. शब्दांजली, कुतूहल कोपरा असे अनेक उपक्रम राबवत आहे. हे सगळे उपक्रम शिक्षक आणि पालकांच्या मदतीने ऑफलाईनच चालवत आहोत, असे सृजन आनंद, कोल्हापूर या शाळेच्या संचालक सुचिता पडळकर यांनी दिली. ही शाळा शिक्षणतज्ञ लीलाताई पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे. ही शाळा राज्यभर प्रयोगशीलतेसाठी ओळखली जाते.

प्रश्न : अभ्यासाची पूर्वतयारी कशी करून घेत आहेत?

उत्तर : आमची शाळा चौथीपर्यंत आहे. इयत्तानुसार आम्ही उपक्रम चालवतो. उदाहरणार्थ आम्ही शाळेत कुतूहल कोपरा चालवतो. त्या कोपर्‍यात एक वस्तू आणून ठेवतो. जी वस्तू असेल त्याची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा करायची. भोक पडलेला दगड, पीस, छोटे वांगं, कर्दळीचे झाड अशा अनेक वस्तू तिथे ठेवल्या जातात. एका विद्यार्थ्याने तर सापाचे पिल्लू ठेवलेली बरणीच तेथे ठेवली होती. एकाने म्हशीचे शिंग आणून ठेवले. म्हशीचे शिंग वजनाला हलके असते हे तेव्हाच सर्वांना कळाले. या कोपर्‍यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल जागे होते आणि त्यांना माहिती गोळा करायची सवय लागते. सध्या शाळा बंद आहे, पण हा कुतूहल कोपरा घरातसुद्धा सुरू करता येईल. आम्ही आमच्या पालकांना तसे आवाहन केले आहे.

शब्दांजली हा असाच भाषेचा विकास करणारा उपक्रम आहे. मुलांनी अनुस्वार असलेले जास्तीत जास्त शब्द लिहायचे. एक क्रियापद घेऊन त्याचा वापर करणारे वाक्य लिहायचे. आमच्या शाळेतील दुसरीच्या एका मुलीने अनुस्वार असलेले २२० शब्द लिहिले आहेत. ‘लागली’ या क्रियापदाचा वापर करणारे६० पेक्षा जास्त शब्द एका मुलाने लिहिले. असे अनेक शब्दप्रयोग केलेले कागद आम्ही गोळा केले आणि १५ जुलै रोजी त्यांचे शाळेत तोरण बांधले. आमच्या शाळेच्या संस्थापिका लीलाताई पाटील यांच्या स्मृतींना आम्ही आमची ही शब्दांजली अर्पण केली.

गणिताची तयारी करून घेताना मात्र शिक्षकांना अनेक कल्पना लढवाव्या लागल्या. शेंगदाणे घ्या. तीन तीन शेंगदाण्याची ओळ तयार करा. आपण दाणे कितीच्या पटीत मांडले ते मोजा. अशा पद्धतीने मुलांना गुणाकार आणि अन्य गणिती क्रिया टप्प्याटप्प्याने शिकवल्या. नाणी, कालमापन आणि व्यावहारिक गणित अशाच पद्धतीने शिकवले. पहिलीसाठी पाठ शिकवताना ५ करवंदे घ्या. ते एका पानावर ठेवा. त्याचे चित्र काढा. ते रंगवा. या एका उपक्रमातून मुले अनेक क्रिया शिकली.

लेखनाची तयारी अशीच करत आहोत. वर्तमानपत्रातील बातम्या व जाहिरातींचे वाचन करून त्याच्या नोंदी मुले करत आहेत. ‘आम्ही आता घरीच खेळतो, दीर्घ सुट्टीच्या या काळात माझ्यात झालेले बदल’ असे लेखनाचे वेगवेगळे विषय त्यांना दिले जात आहेत. पाठांतरही सुरूच आहे. अभ्यासपूर्वक असे असंख्य उपक्रम आम्ही चालवत आहोत.

प्रश्न : यापुढचे वेळापत्रक कसे असेल आणि घरीच चाचणी परीक्षा कशी घेणार?

उत्तर हे सध्या राबवले जात असलेले उपक्रम आहेत. ३० जुलैपासून आम्ही पुस्तकाभिमुख उपक्रम सुरू करू. या उपक्रमांच्या सगळ्या बारीकसारीक नोंदी करत आहेत. त्यावरून मुलांचे मूल्यमापन सुरू आहे. मुलांची आम्ही ऑगस्ट महिन्यात घराघरात कृतिपत्रिकेद्वारे चाचणी परीक्षा घेणार आहोत. मुले काय शिकली आणि शिक्षकांनी काय शिकवले असे दुहेरी मूल्यमापन असेल.

शाळेत परस्पर विश्वास रुजवला जातो. आनंददायी पद्धतीने शिकवले जाते. पण त्याचबरोबर वयानुरूप जाणिवा, जबाबदारीचे भानही रुजवले जाते. त्यामुळे मुले बघून लिहिणार नाहीत, हा विश्वास आहे. कारण आपल्याला जे आले नाही ते ताई पुन्हा शिकवणार आहेत याची विद्यार्थ्यांना आणि पालकांना खात्री आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताण निर्माण होत नाही. शाळेत सगळ्याच परीक्षा ताणतणावरहीत घेतल्या जातात.

आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की, अशा पद्धतीने आमची मुले तयार होतील. जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील तेव्हा आम्हाला अभ्यासक्रम कमी करण्याची गरज भासणार नाही. ठरलेला अभ्यासक्रम आमची मुले गतीने पूर्ण करतील आणि त्या त्या इयत्तांना अपेक्षित असलेले ज्ञान आमची मुले मिळवतीलच. याचे श्रेय शिक्षक आणि पालकांनाच आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com