नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये दरवळणार दुर्मिळ वनस्पतींचा सुगंध

स्कूल ऑफ नर्सरीद्वारे शाळेत तयार होणार रोपवाटिका
नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्ये दरवळणार दुर्मिळ वनस्पतींचा सुगंध

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वनस्पती आणि पर्यावरण विषयाबाबत शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि वृक्षारोपणात सहभाग वाढण्यासाठी राज्यातील शाळेत स्कूल ऑफ नर्सरी (कॅम्प) ही विशेष योजना राबविली जात आहे...

ही केंद्राची योजना असून सामाजिक वनीकरण विभागाद्वारे राबविली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून शाळांची निवड केली जाणार आहे.

नाशिक जिल्हयातील सय्यद पिंप्री येथील नूतन माध्यमिक विद्यालय अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज आणि देवळा येथील शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल या दोन शाळांची स्कूल ऑफ नर्सरीसाठी निवड करण्यात आली आहे.

नाशिक वनवृत्तातून एकूण ७ शाळांची निवड या योजनेसाठी केली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील दोन शाळांची निवड करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग शाळेत राबविला जात आहे. निवड झालेल्या शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोणत्या शाळांना परवानगी द्यायची याची जबाबदारी सामाजिक वनीकरण विभागाकडे आहे. नियमांमध्ये बसणार्‍याच शाळांची निवड स्कूल ऑफ नर्सरीसाठी केली जाते. नाशिक जिल्ह्यातील वरील दोन्ही शाळेत विविध प्रजातीची वन औषधी रोपे, दूर्मिळ रोपे, विशिष्ट रोपे तेथील नर्सरीमध्ये तयार केली जाणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून यासंबंधीचे पत्र सामाजिक वनीकरण विभागाला आले आहे. स्कूल ऑफ नर्सरी योजना २०२१ ते २०२५ पर्यंत राबविली जाणार आहे. या योजनेत केंद्र आणि राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त शाळांनाच सहभाग घेता येतो.

इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा वृक्षारोपण करणे, वृक्ष वाढविणे आदींसह रोपणासंदर्भाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सर्हभाग असणार आहे. ज्या शाळांमध्ये राष्ट्रीय हरीत सेना कार्यरत आहे अशाच शाळांची निवड या योजनेत करण्यात येणार आहे.

शाळांची निवड करताना सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत: शाळेत जाउन पाहणी करतात. तेथे शाळेत रोपे तयार करण्यासाठीची जागा, पाण्याची सोय या सर्व गोष्टींची पाहणी केली जाते. शाळेतील या नर्सरीमध्ये केवळ स्थानिक प्रजातीची रोपे असणे बंधनकारक राहणार आहे.

रोपांसाठी पन्नास हजारांचा निधी

ज्या शाळांमध्ये स्कूल ऑफ नर्सरी सुरु होणार आहे. त्या शाळांना रोपांच्या तयारीसाठी पन्नास हजारांचा निधी मिळ्णार आहे. हा निधी शासनाकडून मिळ्णार असून एका शाळेला एक हजार रोपे तयार करता येणार आहे. याहून अधिक रोपांची निमिर्ती करायची असेल तर, तसा प्रस्ताव सामाजिक वनीकरण विभागाकडे सादर करावा लागेल. रोपे तयार करण्यासाठी शाळेला सामाजिक वनीकरण विभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

शाळांची आकडेवारी

  • नाशिक - ७

  • पुणे - ८

  • ठाणे - ७

  • औरंगाबाद - ७

  • अमरावती - ८

  • नागपूर -७

स्कूल ऑफ नसर्रीसाठी संबंधित शाळा नियमात बसणार्‍या असाव्यात तरच त्यांना या योजनेत सहभागी होता येऊ शकते. शाळेची जागा, पाण्याची व्यवस्था आदींसह ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या पूर्ण असाव्यात. नाशिक वनवृत्तातून सात तर जिल्ह्यातून सैय्यद पिंपरी आणि देवळा अशा दोन शाळांची स्कूल ऑफ नर्सरीसाठी निवड झाली आहे.

सी. डी. भारमल, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com