मुलींच्या कल्याणासाठी योजना डझनभर; मात्र लाभार्थी छटाकभर

मुलींच्या कल्याणासाठी योजना डझनभर; मात्र लाभार्थी छटाकभर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महिला व बालकल्याण विभागातर्फे (Women and Child Welfare Department ) मुलींच्या कल्याणासाठी डझनभर योजना आहेत. मात्र त्याची फलश्रुती पाहिल्यास ती योजना समाजकल्याण विभागाकडे (Social Welfare Department) किंवा शिक्षण विभागाकडे (Education Department) वर्ग केल्याचे समोर येत आहे. दोन-तीन खात्यांचे उंबरठे झिजविल्यानंतर ठराविक लाभार्थ्यांच्या पदरात लाभ पडत असल्याचे स्पष्ट होत आहे...

महिला व बालकल्याण विभागातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजना १ ऑगस्ट २०१७ पासून सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत शासन आर्थिक सहाय्य करते. या योजनेत एक मुलीला १८ वर्षे कालावधीसाठी ५० हजार, दोन मुली असल्यास प्रत्येक मुलीच्या नावे २५ हजार रुपये ठेवले जातात.

७.५ लाख रुपयांपर्यंत मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि फक्त कौटुंबिक नियोजन प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच हा लाभ मिळतो. प्रत्येक सहा वर्षांनंतर कुटुंब जमा व्याज काढून घेऊ शकते. मुदत ठेवींच्या निर्मितीसाठी २० कोटी (आर्थिक वर्ष २०१७-१८) आणि १४ कोटी रुपये (वित्तीय वर्ष २०१८-१९) वितरित करण्यात आले.

या योजनेची जाहिरात सर्वत्र झाली. मात्र नाशिक जिल्ह्यात वर्षाला साधारणपणे पंधरा ते वीस जणांच्यावर कोणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही.

दुसरी योजना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना आहे. ती समाजकल्याण विभागाकडे आहे. त्यातही पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना वर्षाला सहाशे रुपये शिष्यवृत्ती स्वरुपात मिळतात. शिष्यवृत्तीची रक्कम दिवसाला दोन रुपये पडते. आजच्या मुलींचा रोजचा खर्चच ३० ते ४० रुपायंच्या पुढे जातो. त्यामुळे या सहाशे रुपयांचे अप्रुप आता कोणाला राहीलेले नाही.

अल्पदरात सॅनीटरी पॅड देण्याची अस्मीता योजना आहे. ही ग्रामपंचायतीद्वारे राबविण्यात येते. अल्पदरातील सॅनेटरी पॅडसाठी ग्रामपंचायतीत सहसा कोणी जातच नाही. काही गावात ती सोय आहे. मात्र ठराविक महिला वगळता कोणी त्याकडे फिरकतदेखील नाही.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थीनींना मोफत गणवेश दिले जातात. त्याचा फायदा ग्रामीण भागातील मुलींना होतो. यापूर्वी मुलींना मोफत सायकल देण्याचा निर्णय झाला होता. मात्र गेल्या पाच वर्षांपासून त्या सायकलीदेखील मानव विकास योजनेच्या माध्यमातून दिल्या गेल्या.

त्यामुळे या योजनादेखील आता महिला व बालकल्याण विभागाकडे राहिलेल्या नाही. शाळेपर्यंत जाण्यासाठी मोफत प्रवास पास, स्वसंरक्षणासाठी कराटे क्लासेस आहेत मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांनाही कोरोनामुळे घरघर लागली आहे. ज्या योजना आहेत त्यांना कालानुरुप बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com