
नाशिक । प्रतिनिधी Nashik
करोनाच्या ( Corona ) अडीच वर्षानंतर प्रथमच पूर्व प्राथमिक शाळापासून ते बारावीपर्यंतच्या सर्व सरकारी व खासगी शाळांच्या( Schools ) नवीन शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. रविवारी नाशिक शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या शालिमार, मेनरोड ते रविवार कारंजा परिसर विद्यार्थी व पालकांच्या शालेय साहित्य व गणवेश खरेदीसाठीच्या गर्दीने फुल्ल होते.
सन 2022 व 2023 या नवीन शैक्षणिक वर्षाला येत्या 15 जूनपासून प्रारंभ होत आहे. नाशिक शहरातील सुमारे तीन ते चार लाख विद्यार्थी सोमवारपासून शैक्षणिक सत्रात शाळांमध्ये प्रवेश करणार आहेत.
यामध्ये किमान खाजगी इंग्रजी माध्यमाच्या दीडशेहून अधिक शाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांच्या शाळांसाठी गणवेश खरेदीला पालकांना तब्बल दोन दोन तीन तीन तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आज बघायला मिळाले.
विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व गणवेशासाठी खासगी शाळांकडून विशिष्ट दुकानांमधून गणवेश खरेदीचा आग्रह होत असल्याने पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. तसेच शालेय साहित्याच्या किमती वाढल्याने पालकांच्या खिशाला अधिकच झळ बसली.