नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू

नगरपंचायत निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ सुरू

निफाड । प्रतिनिधी Niphad

निफाड नगरपंचायत निवडणुकीचा Nagar Panchayat Election बिगूल वाजला असून नगरपंचायतीसाठी मंगळवार दि.21 डिसेंबर रोजी मतदान तर बुधवार दि.22 डिसेंबर रोजी मतमोजणी होत असल्याने इच्छुक उमेद्वारांची धावपळ वाढली आहे. नगरपंचायतीच्या 17 प्रभागासाठी 17174 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 डिसेंबर पासून उमेद्वार अर्ज भरण्यास प्रारंभ होत असल्याने नेते व कार्यकर्ते पॅनल निर्मितीबरोबरच व्यूहरचनेत व्यस्त झाले आहे. यावर्षी उमेद्वारीसाठी इच्छूकांची संख्या वाढल्याने प्रत्येक प्रभागात बहुरंगी लढतीचे संकेत मिळू लागले आहेत.

निफाड नगरपंचायतीच्या 17 प्रभागातील 17 जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक आयोगाने गुरुवार दि.25 नोव्हेंबर पासून आचार संहिता लागू केली आहे. निफाड नगरपंचायतीसाठी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी सोमवार दि.29.11.2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून जिल्हाधिकारी मंगळवार दि.30.11.2021 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहिर करतील. तर नगरपंचायतीसाठी उमेद्वारी करू इच्छिणार्‍या उमेद्वारांना बुधवार दि.1.12.2021 ते मंगळवार दि.7.12.2021 या दिवशी 11 ते दुपारी 2 या वेळेत सुट्टीचे दिवस वगळून निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर उमेद्वारी अर्ज भरता येणार आहे व याच कालावधीत नामनिर्देशन पत्र स्विकारण्याची वेळ देण्यात आली आहे.

तर दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि.8.12.2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून करण्यात येवून त्याच दिवशी उमेद्वारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी सोमवार दि.13.12.2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर निवडणूक लढवू इच्छिणार्‍या उमेद्वारांना चिन्हांसह अंतिम रित्या निवडणूक लढविणार्‍या उमेद्वारांची यादी उमेद्वारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी जाहिर केली जाईल तर आवश्यकता वाटल्यास मंगळवार दि.21.12.2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदार घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी बुधवार दि.22.12.2021 रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरू करण्यात येईल.

नगरपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया जाहिर झाल्याने व मतदानासाठी थोडाच कालावधी शिल्लक असल्याने पॅनल निर्मितीला वेग आला असून यावर्षी नगरपंचायतीसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. नगरपंचायतीसाठी पुरुष 8663 तर महिला 8511 असे एकुण 17174 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. निफाड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, शिवसेना नेते तथा नगरसेवक अनिल कुंदे यांची सर्वपक्षीय निफाड शहर विकास आघाडी तर भाजपचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस शंकर वाघ यांचे स्वतंत्र पॅनल याबरोबरच खरेदी-विक्री संघाचे संचालक तथा माजी सरपंच बापू कुंदे, युवा नेते सागर कुंदे, काँग्रेसचे मधूकर शेलार यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे संयुक्तिक पॅनल याबरोबरच काही अपक्ष नशिब अजमाविण्याची शक्यता आहे.

आरक्षण सोडतीत अनेक मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना दुसर्‍या प्रभागातून नशिब अजमवावे लागणार आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीने निफाड शहराच्या राजकारणात बरीच उलथा-पालथ झाली असून अनेकांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे नगरपंचायतीची ही निवडणूक कुणासाठीही सोपी नाही. त्यातच उमेद्वारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी अवघा पाच दिवसांवर येवून ठेपल्याने उमेद्वारी करण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जमवाजमन करण्याची इच्छुक उमेद्वारांची धावपळ वाढली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात शह-काटशह यांनाही वेग येत बैठका, गाठीभेटी व उमेद्वार निश्चितीला वेग येत असून पुढील काही दिवस निफाडचे राजकारण चांगलेच तापणार असून कोण कशी पॅनल निर्मिती करतो यावरच विजयी उमेद्वारांचे भवितव्य अवलंबून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com