निवडणुकींसाठी इच्छुकांची धावपळ

निवडणुकींसाठी इच्छुकांची धावपळ

सुरगाणा | वाजिद शेख Surgana

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुरगाणा पंचायत समितीवर ( Surgana Panchayat Samiti )गेली काही वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची( MCP) सत्ता राहिली आहे. सुरगाणा तालुक्यात महत्त्वाचे मानल्या जाणार्‍या बालेकिल्ल्यात इतर पक्षांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागणार आहे.

मागील निवडणुकीत ( Election ) जिल्हा परिषदेच्या तीन गटांपैकी एक गट आणि एक गण भाजपकडे होता आणि उर्वरित सर्व गट व गणांमध्ये माकपचे वर्चस्व राहिले आहे. करोना कालावधीत माकप कार्यकर्त्यांनी गावोगावी जनतेत लसीकरणसंदर्भात जनजागृती केली. लॉकडाऊन कालावधीत विविध गावांतील लोकांना अन्नधान्य देण्याचे काम केले.

सुरगाणा तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींपैकी 40 ग्रामपंचायतींवर माकपची सत्ता आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. सुरगाणा नगरपंचायतीवर शिवसेना व माकप यांनी सत्ता स्थापन करून नवीन गट तयार केला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या केंद्रीय मंत्री झाल्याने तालुक्यात भाजपचा प्रभाव वाढला आहे. माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मानणारा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात असल्याने भाजपसुद्धा माकपला आव्हान उभे करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांनी विविध ठिकाणी मंजूर झालेल्या विकासकामांचे फलक लावले आहेत.

सुरगाण्यातील जनतेला मूलभूत गरजा रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण वीज इत्यादी विकासकामांचा जोर पकडला आहे. सुरगाणा पंचायत समितीवर गेल्या पाच वर्षांत सुवर्णा गांगोडे, मनीषा महाले यांना सभापती व उपसभापती पदावर इंद्रजित गावित यांना संधी मिळाली आहे. माजी आमदार जे. पी. गावित यांच्या अधिपत्याखाली गेली काही वर्षे पंचायत समितीची सत्ता अबाधित राहिली आहे.

तालुक्यातील ग्रामपंचायत, सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे. पी. गावित यांनी तालुक्याच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध केले आहे. आगामी जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर अनपेक्षित लांबल्या असल्या तरी तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेचे तीन गट आणि सहा गण आहेत. या निवडणुकीत लोकसंख्येचा विचार करता एक गट व दोन गण वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तालुक्यात चार गट होतील हे जवळजवळ निश्चित झाले आहे. गट-गण रचनेत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. सुरगाणा हा आदिवासीबहुल तालुका असल्याने निवडणुकीत मोठ्या प्रामाणात चुरस निर्माण होत असते.

सुरगाणा ग्रामपंचायत संपुष्टात येऊन नगरपंचायत स्थापित झाल्यानंतर सुरगाणा गट व सुरगाणा गणदेखील संपुष्टात आले. त्याजागी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नवीन हट्टी गट व हट्टी गण हे अस्तित्वात आले. सुरगाणा तालुक्यातील हट्टी, गोंदुणे व भवाडा हे तीन गट आणि हट्टी, भवाडा, गोंदुणे, भदर, बोरगाव, पळसन असे सहा गण आहेत. हट्टी गटातून भाजपच्या कलावती चव्हाण व हट्टी गणातून भाजपचे एन. डी. गावित हे निवडून आलेले आहेत. उर्वरित सर्व दोन गट व पाच गणातून माकपचे सदस्य निवडून आले आहेत.

विशेषतः यावेळी हट्टी गट व गण याकडे लक्ष लागणार आहे. तसेच आगामी निवडणुकीत विद्यमान सदस्यांना संधी मिळणार की नवीन चेहर्‍यांना संधी मिळणार याची उत्सुकता आहे. हट्टी गट हा अनुसूचित जमाती महिला राखीव होता. यावेळी आरक्षण कसे निघते त्यावर इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. प्रथमदर्शनी संभाव्य उमेदवार म्हणून भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे पुत्र समीर चव्हाण, हट्टी गणातून निवडून आलेले विद्यमान पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित, शिवसेनेकडून तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुका युवक अध्यक्ष राजू पवार, विद्यमान पंचायत समिती सदस्य सुवर्णा गांगोडे संभाव्य उमेदवार असू शकता.

यंदा निवडणुकीत भवाडा गटासाठी माकपकडून निवडणूक लागल्यावर योग्य ते उमेदवार जाहीर होतील. तर शिवसेनेकडून कृष्णा चौधरी, विजय वारडे, संजय पढेर हे संभाव्य उमेदवार असू शकतात. तर भाजपकडून जाहुले येथील माजी तालुकाध्यक्ष सुनील भोये, भाजप पदाधिकारी एन. डी. गावित, ठाणगाव येथील दिलीप महाले आदी संभाव्य उमेदवार असू शकतात. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे स्वतंत्रपणे लढणार का आघाडी करून तोडीचा उमेदवार देण्याचा प्रयत्न करतात हे निवडणूक लागल्यानंतरच स्पष्ट होईल.

माकपमध्ये सुभाष चौधरी, सावळीराम पवार, भिका राठोड, वसंत बागुल, इंद्रजित गावित, मंदाकिनी भोये, मेनका पवार, उत्तम कडू आदी कर्यकर्त्यांसह फौज आहे, तर राष्ट्रवादीकडे चिंतामण गावित, गोपाळराव धूम, राजू पवार, नवसू गायकवाड, आनंद झिरवाळ, सुरेश चौधरी, सुवर्णा गांगुर्डे, रणजित गावित, किसन पवार आदी कर्यकर्ते आहेत.

तर भाजपकडे समीर चव्हाण, एन. डी. गावित, तालुकाध्यक्ष रमेश थोरात, सुनील भोये, मनोहर जाधव, भावडू चौधरी, दिलीप महाले आदी कार्यकर्ते आहेत. तसेच शिवसेनेकडे मोहन गांगुर्डे, भरत वाघमारे, परसराम वाडे, कृष्णा चौधरी, संजय पढेर आदी कार्यकर्ते आहेत. तालुक्यातील नेते व मतदार जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीस सज्ज झाले आहेत. यात माकप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी होते की सर्व पक्ष स्वतंत्र लढतील हे बघणे रंजक ठरेल.

Related Stories

No stories found.