
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत ( RTE ) खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर मोफत प्रवेशाची प्रक्रिया ( RTE Admission Process )सध्या सुरू आहे. सोडत यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश मुदत संपली असताना, अद्यापही जिल्ह्यात सुमारे 30 टक्के जागा रिक्त आहेत. मात्र, आठवडा उलटूनही रिक्त जागांवर प्रवेशासंदर्भात वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम असून, प्रवेशप्रक्रिया खोळंबली आहे.
शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी नाशिक जिल्ह्यातील 422 शाळांमध्ये प्रवेशासाठी चार हजार 927 जागा उपलब्ध होत्या. या जागांवर प्रवेशासाठी तब्बल 16 हजार 567 अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीत चार हजार 513 नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रवेशासाठी दोन वेळा मुदत दिल्यानंतर 10 मेपर्यंत तीन हजार 284 जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. नियमित प्रवेशाची प्रक्रिया आटोपली असताना, आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती.
मात्र, आठवडा उलटूनही अद्यापपर्यंत रिक्त जागांवर प्रवेशाचे वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केलेले नाही. नवीन शैक्षणिक वर्षाला पुढील महिन्यापासून सुरुवात होत असताना, त्याआधी सर्व रिक्त जागांवर प्रवेशप्रक्रिया पूर्ण व्हावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
33 टक्के जागा रिक्तच
शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या या प्रक्रियेअंतर्गत दोनवेळा मुदतवाढ देऊनही जिल्हास्तरावर 33 टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत.