ग्रामस्थांच्या श्रमदानातून रस्ता; डांबरीकरणाची मागणी

ग्रामस्थांच्या श्रमदानातून रस्ता; डांबरीकरणाची मागणी

हरसूल। वार्ताहर | Harsul

त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar), पेठ (peth), तसेच हरसूल (harsul) भागातील अनेक रस्ते खडीकरण, डांबरीकरणाच्या (Asphalting) प्रतीक्षेत आहे. अनेक रस्त्यांना घरघर लागली असून आजारी पडले आहे. यामुळे नागरिकांना मनस्तापासह डोकेदुखीला सामोरे जावे लागत आहे.

नाचलोंढी अंतर्गत पायरपाडा - कोळूष्ठी रस्ता आहे. ग्रामस्थांनी श्रमदानातून मुरूम मातीचा थर देत जाण्या- येण्यासाठी वाट मोकळी करून घेतली आहे. मात्र खडीकरणासह डांबरीकरण (Asphalting) करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. त्र्यंबकेश्वर तसेच पेठ तालुक्यांच्या सीमावर्ती भागांचा जवळचा संंबंध आहे.

यामुळे पेठच्या काही गावांचा हरसूल बाजारपेठेकडे मोठा कल आहे.मात्र अनेक गावांच्या रस्त्यांची दुर्दशा (Road misery) झाल्याने दळणवळणाच्या समस्यांची वाताहत आहे. त्यापैकी नाचलोंढी ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या कोळूष्ठी - पायरपाडा रस्ता आहे. साधारणतः दीड किलोमीटरचा रस्ता असून या रस्त्याची दयनीय दुरवस्था झाली होती. कोळूष्ठी ते पायरपाडा केवळ नावापुरताच रस्ता उरल्याने ग्रामस्थांना या रस्त्यावरून प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यातील खडी उखडून खड्डा बनला आहेत.

यामुळे ग्रामस्थांना डोकेदुखी व मनस्ताप सहन करत ये - जा करावी लागत आहे. नुकत्याच या रस्त्यावर ग्रामस्थांनी श्रमदानातून मुरूम माती टाकून तसेच उखडलेली खडी बाजूला सारून रस्ता (road) बनविला आहे. शासनाच्या लाखो रुपयांचा रस्ता निर्मितीच्या योजनांचा (Road construction plans) बोजवारा उडाल्याने ग्रामस्थांना चक्क रस्त्यासाठी श्रमदान करण्याची वेळ येत असल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

या श्रमदानप्रसंगी प्रकाश गावित, मनोहर बोरसे, विष्णू बोरसे, अंबादास बोरसे, उत्तम भोये, काशिनाथ गावित, सुरेश गावित, अरुण बोरसे, गोपाळ महाले , काशिनाथ तिदमे, उषा गावित,पुष्पा गावित, मंगल आहेर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

पायरपाडा - ते कोळूष्ठी रस्त्यावरील खडी उखडल्याने वाहने चालवितांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून या रस्त्यावर मुरूम माती टाकली आहे. यामुळे काही अंशी जाणे येणे सोपे झाले आहे.मात्र नव्याने खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

- प्रकाश गावित, ग्रामस्थ कोळूष्ठी

Related Stories

No stories found.