गोदाकाठ सुशोभिकरणाऐवजी नदी पुनर्जिवित होणे गरजेचे

नदी प्रवाह बारमाही व्हावा;गोदाप्रेमींची मागणी
गोदाकाठ सुशोभिकरणाऐवजी नदी पुनर्जिवित होणे गरजेचे

नाशिक । कुंदन राजपूत

गोदावरी कॉक्रिटिकरणानंतर गोदा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. सन 2011 मध्ये न्यायालयाने गोदावरी मृत नदी का घोषित करु नये असा प्रश्न विचारत तिचे पाणी वापरायोग्य नाही असे मत नोंदवले होते. मात्र त्यानंतर राजेंद्रसिंग व गोदाप्रेमींनी लढा उभारला व आजकुठे गोदाप्रदूषणासाठी प्रयत्न सुरु झाले असून सुशोभिकरणाऐवजी गोदा व तिच्या उपनद्या पुनर्जिवित करण्यासाठी गोदाप्रेमी एकवटले आहेत.

सद्यस्थितीत स्मार्टसिटी अंतर्गत गोदा सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. पण गोदाकाठ सुशोभिकरण करण्याऐवजी गोदा पुनर्जिवन गरजेचे असल्याचे गोदाप्रेमींचे म्हणणे आहे. शिवाय शहरातील टाकळी, तपोवन, गंगापूर, चेहडी व दसक पंचक येथील मलजल शुध्दिकरण प्रकल्पच गोदाजल प्रदुषणासाठी कारणीभूत ठरत आहे. या प्रकल्पातून 30 बीओडी इतकी मात्रा असलेले लाखो लीटर पाणी गोदेत सोडले जात आहे. जुन्या मानांकनानुसार हे प्रकल्प कार्यन्वित असून त्यामुळे त्याचे नुतनीकरण केले जावे अशी मागणी गोदाप्रेमीनी केली आहे. त्यास यश येत असून नवीन टेक्नोलॉजी असलेले प्रकल्पावर महापालिका विचार करत आहे.

जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर

पूर्वी गोदा नदीपात्र व तिचा आसपासचा परिसर जैवविविधतेने संपन्न होता. मात्र नदीपात्रात अतिक्रमण होत गेले. कॉक्रिटिकरणामुळे गोदेचे भूमिगत जलस्त्रोत नष्ट झाले. जैवविविधता टिकविण्यासाठी नदीचा प्रवाह बारमाही असणें गरजेचे आहे. पण पावसाळा सोडला तर गोदा इतर दिवशी कोरडा असते. त्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवून भूजल पातळी वाढवली पाहिजे. जेणेकरुन उशीराने का होईना गोदेचे अटलेले भूमिगत जलस्त्रोत पुन्हा जिवंत होतील व नदी बारमाही होईल.

उपनद्यांचे अस्तित्व नष्ट

1) अरुणा नदी

गोदावरी व अरुणा नदीचा रामकुंड येथे संगम या दोन्ही नद्यांचा संगम होतो म्हणून नाशिकला कुंभमेळ होतो. सन 1883 च्या नकाशानूसार अरुणा नदिचा उगम हा रामजेश किल्ला येथे होतो. ब्रिटिशकालीन गॅजेटमध्ये याचा उल्लेख आढळतो. पण नदी पात्रावर अतिक्रमण करुन ही नदी बुजविण्यात आली. सध्या अरुणा नदी इंद्रकुंड येथे जिवंत स्वरुपात अस्तित्वात आहे. पुढे मालेगाव स्टॅण्ड येथील उतारावून ही नदी रामकुंडाकडे येयची. आता नदीपात्र बुजवून त्यावर रस्ता केलेला आहे.

2) वरुणा नदी

वरुणा नदीचे अस्तित्व आजही आहे पण तिला गटारीचे स्वरुप देण्यात आले. चामारलेणी येथे वरुणाचा उगमस्थान आहे. पावसाळ्यात तिच्या पाण्याचा प्रवाह वाघासारखा झडप घालतो. म्हणून जुन्या लोकांनी तिचे नाव वाघाडी ठेवले. ही गोदेची एकमेव उपनदी आहे की जी अस्तित्वात आहे व तिचे पुनर्जिवन करता येणे शक्य आहे.

3) वाघाडी

जेथे गोदेला मिळते त्याच्या बरोबर बालाजीकोट येथे सरस्वती नदी आहे. पण तिच्यावर अतिक्रमण करुन ही नदी बुजविण्यात आली. तिचा आता सरस्वती नाला करण्यात आला. तिचा प्रवाह बुजविल्यामुळे दरवर्षी सराफा बाजारात पूरस्थिती निर्माण होते.

4) कपिला

तपोवनात गोदा व कपिला यांचा संगम होतो. आडगाव येथे तिचा उगम होत असे. पण सद्यस्थितीत ही नदि अस्तित्वात ठेवण्यात आली नाही.

5) नंदिनी

गोदेच्या प्रमुख उपनद्यांमध्ये नंदिनी ही मोठी नदी होती. त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे तिचा उगमस्थान आहे. पण नंतरच्या काळात नंदिनीची नासर्डी झाली. तिला गटारीचे स्वरुप प्राप्त झाले.

प्राचीन कुंड पुनर्जिवित करण्याचा प्रयत्न

- गोदेच्या जशा पाच उपनद्या आहे. तशाच रामकुंड ते खंडोबा पटांगण या नदी पत्रात पाच प्राचीन कुंड अस्तित्वात आहे. नदिचे कॉक्रिटिकरण करण्यात आले व प्राचीन कुंड बुजविण्यात आले. अनामिक, दश्वामेघ,रामगया,पेशवे व खंडोबा हे पाच कुंड आहे. न्यायालयाच्या आदेशानूसार हे कुंड कॉक्रिटिकरण मुक्त करण्याचे काम सुरु आहे. पण सबंधित ठेकेदाराने 70 टक्केच काम पूर्ण केले.

सन 2011 ला आसाराम बापू पूल येथील गोदापात्रात पाणवेलीत अडकून चार म्हशी मृत झाल्या. त्यानंतर गोदा प्रदूषणाचा प्रश्न न्यायालयात गेला. न्यायालयाने गोदा जिवंत आहे का? या शब्दात ताशेरे ओढले. त्यानंतर गोदेसाठि लढा उभा राहिला. त्यावेळेस गोदेची जी परिस्थिती होती ती आता सायखेडयापासून पुढे आहे. काही प्रमाणात गटारीचे व मलजल गोदेत थेट मिसळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पण गोदा पुनर्जिवित करण्यासाठी खूप काम होणे बाकी आहे.

राजेश पंडीत, नमामि गोदा फाउंडेशन

गोदेच्या पाच उपनद्यांपैकी वरुणा व नंदिनी या दोनच नद्या अस्तित्वात आहे. इतर तीन नद्या नामशेष झाल्या आहेत. तर नदीपात्रातील पाच प्राचीन कुंड पुनर्जिवित करण्यासाठी कॉक्रिटिकरण काढण्याचे काम सुरु आहे. पण ठेकेदार काम अर्धवट सोडून गेला आहे.

देवांग जानी, गोदाप्रेमी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com