नुकसानग्रस्तांचा महामार्गावर ठिय्या

प्रशासनाकडून दखल न घेतल्याने संताप
नुकसानग्रस्तांचा महामार्गावर ठिय्या

सिन्नर । वार्ताहर Sinnar

शहरातून जाणार्‍या सरस्वती नदीला ( Saraswati River ) गुुरुवारी (दि.1) रात्री आलेल्या महापूरात ( Flood )नदीकाठच्या भागातील अनेक घरे वाहून गेल्याने शेकडो जण बेघर झाले. संपप्त नागरिकांनी नाशिक-पुणे महामार्गावर ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

शहरासह तालुक्यात सर्वत्र सायंकाळनंतर झालेल्या पावसाने शहरातून जाणार्‍या सरस्वती नदीला 40 वर्षांत प्रथमच महापूर आल्याचे काहींनी सांगितले. नदीपात्रातील पाण्याने धोक्याची पातळी गाठून पाणी थेट नदीकाठच्या घरे, दुकानांमध्ये शिरले. काही तासांतच नेहरु चौक, पडकी वेस, अपना गॅरेज व संगमनेर नाका परिसरातील झोपडपट्टी भागातील नदीकाठची अनेक घरे पाण्यात वाहून गेली.

रात्रीतून छप्पर हरवल्याने या नागरिकांना भरपावसात उघड्यावर रात्र काढण्याची वेळ आली. काल (दि.2) सकाळी नदीकाठच्या भागातील वाताहत प्रक्रर्षाने जाणवत होती अचानक रास्ता रोको करण्यात आल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबच रांगा लागल्या. घटनेची माहितीची मिळताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांंनी पोलिस सेवकांसह घटनास्थळी पोहचत आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त महिला आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय जागेवरुन हलणार नसल्याचे स्पष्ट करत अधिकार्‍यांना धारेवर धरले.

यामुळे अपना गॅरेज ते आडवा फाटा परिसरातपर्यंत वाहतुक कोंडी झाल्याने प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागला. आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने काही काळासाठी महामार्गावरील वाहतुक आडवा फाटा ते सरदवाडी रोडने बायपासकडे वळवण्यात आली होती. यावेळी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विनायक सांगळे, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, रामभाऊ लोणारे, राजाराम मुरकुटे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आंदोलकांना शांत केले. त्यानंतर अधिकार्‍यांशी चर्चा करत त्यांना रेस्ट हाऊसमध्ये हलवण्यात आले. नुकसानीची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्यात येणार असल्याचे प्रभारी तहसिलदार सागर मुंदडा यांनी सांगितले. प्रांताधिकारी अर्चना पठारे यांनीही आंदोलनकर्त्यांची समजूत घालत त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी भिकुसा हॉलची पाहणी केली.

आजचे झाले, उद्याचे काय?

पुराच्या पाण्यात अनेकांची घरे वाहून गेल्याने संसार उघड्यावर पडले. रहायलाही जागा शिल्लक नसून घरातील अन्नधान्य, कपडे, वस्तू वाहून गेल्याने आजच्या जेवणाचीही त्यांना चिंता पडली होती. प्रशासनाने आजच्या नुकसानग्रस्तांना जेवणाची सोय केल्याचे सांगितले. त्यावर आंदोलनकर्त्यांनी आजचे झाले. मात्र, उद्याचे काय असा सवाल उपस्थित केला. पाण्याच्या बाटल्यांचीही यावेळी व्यवस्था करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com