विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

नांदगाव | संजय मोरे Nandgaon

नांदगाव शहरात ( Nandgaon )सप्टेंबर 2021 मध्ये उद्भवलेल्या महापूराच्या पार्श्वभूमीवर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि भुसावळ रेल्वे विभाग अधिकार्‍यांच्या तांत्रिक निरीक्षण अहवालानुसार मटन मार्केट वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने अखेर गेल्या आठवड्यात मटन मार्केटसह गांधी चौक फरशी पुलावरील तसेच समता मार्ग (पंचाळ गल्ली)लेंडी नदीपात्रातील नियंत्रण रेषेच्या आतील अतिक्रमणांवर (encroachments )बुलडोझर फिरला.

मटन मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईत गांधी चौक, नवीन शॉपिंग सेंटरजवळील भाग, समतामार्ग (पंचाळ गल्ली) येथील रहिवासी बेघर झाले तर सुमारे दोनशेच्या आसपास टपरीधारकांच्या व्यवसायांवर कुर्‍हाड कोसळली. त्यामुळे या सर्वांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेल्वे गेट बंद करून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात आली. मात्र वाद्ग्रस्त ठरलेला भुयारी मार्ग पाणी साचत असल्यामुळे चर्चेत आला होता. त्यामुळे अडथळा ठरणारे मटन मार्केट हटविण्यात यावे, अशी रेल्वे विभागाने मागणी केली होती. याबाबत रेल्वे विभागाने तांत्रिक निरीक्षण अहवाल सादर करुन नगरपरिषदेला लेखी कळविले होते. त्यानुसार नगरपरिषदेने मटन मार्केट जमीनदोस्त केले.

या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने देखील भुयारी मार्गातून नवीन रस्ता तयार करून देण्याचा दिलेला शब्द पाळायला हवा. भविष्यात भुयारी मार्गामध्ये पाणी साचल्यास त्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची राहिल, असे पत्र नगरपरिषदेेच्या वतीने रेल्वेच्या भुसावळ येथील अपर मंडळ महाव्यस्थापकांना पाठविण्यात आले आहे. भुयारी मार्गावरील भिंत काढून घेण्यासोबत नदीपात्रातील पाणी वाहते करण्यासाठी कार्यवाही करावी. भुयारी मार्गावरील रेल्वे विभागाने बांधलेली भिंत पाडण्याची कार्यवाही आता कधी सुरु होणार, याकडे नांदगावकरांचे लक्ष लागले आहे.

नांदगाव शहरातील अतिक्रमणे तर काढली, परंतू अनेक वर्ष रहिवास असलेले नागरिक बेघर झाले असून त्यांंचे पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. नगरपरिषदेच्या वतीने शहरातील मटन मार्केट, गांधी चौक फरशी पुलावरील तसेच समता माग र्(पंचाळ गल्ली) आदी भागात वर्षानुवर्षे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांची अतिक्रमणे होती. दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रातील व्यवसायिकांना आपत्ती व्यवस्थापनातर्फे सावधगीरीचा इशारा देण्यात येत होता. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात महापूर आल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता.

अतिक्रमणांमुळे पुराचे संकट ओढवल्याचा निष्कर्ष काढला गेला आणि अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. त्यात अनेकांचे संसार रस्त्यावर आल्याने त्यांच्या पुनर्वसनाची मागणी पुढे आली आहे. पुनर्वसन कधी, कोठे आणि कोण करणार? नगरपरिषदेचे मुख्यधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांनी लवकरच विस्थापितांचे पुनर्वसन करण्यात येईल, असे प्रसार माध्यमांना सांगितले आहे. पावसाळा तोंडावर आला असून विस्थापितांचे त्वरेने पुनर्वसन होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासकिय पातळीवर युध्दपातळीवर हालचाली झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com