डिझेल तिढा सुटला; लालपरी पुन्हा धावणार

डिझेल तिढा सुटला; लालपरी पुन्हा धावणार

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgoan

राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नाशिक विभागात (Nashik Division) अव्वल स्थानावर असलेल्या नांदगाव आगाराची (Nandgaon Depot) डिझेल टंचाई माजी आमदार पंकज भुजबळ (Pankaj Bhujbal) यांनी लक्ष घातल्याने संपुष्टात आली आहे...

विभागीय नियंत्रकांनी आगारास नियमित डिझेल पुरवठा करण्याची ग्वाही दिल्याने फक्त डिझेलअभावी बंद कराव्या लागलेल्या अनेक लालपरींची सेवा पुन्हा उपलब्ध होणार असल्याने नांदगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उत्पन्नाच्या बाबतीत नाशिक विभागात नांदगाव आगार अव्वल स्थानावर असतांना देखील डिझेल टंचाईचे ग्रहण लागल्यामुळे अनेक एसटीच्या (ST Bus) फेर्‍या आगारास बंद कराव्या लागल्या होत्या. नांदगाव रेल्वे स्थानकावर अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे रद्द झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी एस. टी. बसस्थानकाकडे मोर्चा वळविला होता.

प्रवासाचे सुरक्षित एकमेव साधन एस. टी. बस असल्याने नागरिक या प्रवासाला प्राधान्य देत होते. त्यामुळे नांदगाव आगाराच्या उत्पन्नात देखील घसघशीत वाढ झाली होती. असे असतानादेखील डिझेल उपलब्ध करून दिले जात नसल्याने अनेक एस. टी. च्या फेर्‍या बंद करण्याची वेळ आगारावर आली असल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले होते.

विविध मार्गांवर ये-जा करणार्‍या एस. टी. बसेसला पुरेसा डिझेल दिले जात नसल्याने डिझेल अभावी रस्त्यावरच बस बंद झाल्याने पर्यायी साधनांचा वापर करून प्रवाशांना ऐच्छिक स्थळी पोहचावे लागत होते. या संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्याकडे नांदगाव डेपोची समस्या प्रवाशांतर्फे पोहचवली गेल्याने भुजबळ यांनी परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकांना याबाबत पृच्छा केल्याने अवघ्या अर्ध्या तासाच नांदगाव आगारासाठी डिझेल उपलब्ध झाले होते.

मात्र काही दिवसानंतर पुन्हा डिझेल टंचाईचे ग्रहण लागल्याने प्रवाशांचे हाल सुरू झाले. पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त माजी आ. पंकज भुजबळ यांचे नांदगावी आगमन झाले असता त्यांनी बस आगाराच्या कार्यशाळेला भेट दिली असता डेपोतील कर्मचार्‍यांनी त्यांच्यासमोर डिझेल टंचाईसह इतर समस्यांचा पाढाच वाचला.

नियमित डिझेल पुरवठा होत नसल्याने अनेक बसफेर्‍या रद्द कराव्या लागत आहे. यामुळे महामंडळाचे उत्पन्न बुडण्यासह प्रवाशांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याकडे भुजबळांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी तात्काळ नाशिक विभागीय नियंत्रक पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधत आगारास नियमित डिझेल पुरवठा कां केला जात नाही? अशी पृच्छा करत धारेवर धरले.

त्यामुळे आगारास डिझेल पुरवठा पुन्हा सुरळीतरित्या सुरू झाला असल्याने कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिझेल उपलब्ध झाल्यामुळे बंद करण्यात आलेल्या लालपरीची सेवा परत नियमितरित्या उपलब्ध होणार असल्याने तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com