सीसीटीव्ही खरेदीची चौकशी व्हावी
नाशिक

सीसीटीव्ही खरेदीची चौकशी व्हावी

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात बसविलेल्या चिनी बनावटीचे सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्र्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात ११०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत निविदा काढण्यात आली. त्यानुसार शहरातील हिकव्हिजन कंपनीचे काही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले. परंतु हिकव्हिजन कंपनी चिनी असून केंद्र सरकारने सुरक्षिततेच्या कारणास्तव चिनी अ‍ॅपसह चिनी उत्पादनावर बंदी आणली आहे. असे असताना नाशिक महापालिका या चिनी कंपनीचे कॅमेरे बसवण्यास आग्रही असल्याचे कारण काय आहे? जगातील अनेक देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव या चिनी कंपनीस नाकारले आहे.

सद्यस्थितीत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे नवीन नामांकन नियमात बसत नाही. नागपूर शहरात हिकव्हिजन कंपनीचे ६०० सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने हटवण्यात आले. नाशिक शहरात बसवलेल्या कॅमेर्‍याची तीन वेळेस चाचणी घेण्यात आली व या तिन्ही चाचणीत सदरची यंत्रणा निष्फळ ठरली. त्याचे प्रमुख कारण होते यात वापरलेल्या OFC केबलचा निकृष्ट दर्जा. असे असताना शहरात हिकव्हिजन कंपनीचेच कॅमेरे बसवण्याचा हट्ट धरला जात असल्यामुळे यात गौडबंगाल असल्याचे निदर्शनास येत आहे.

नाशिक शहरातील हिकव्हिजन कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने काढण्यात यावे आणि सीसीटीव्ही कॅमेरा प्रकरणाची सखोल चौकशी करावी. स्मार्ट सिटीच्या बैठकीत सत्ताधारी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस आदी सर्व संचालकांना पत्र पाठवून तत्काळ चिनी कॅमेरे खरेदीचा विषय रद्द करावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com