कळवण । प्रतिनिधी Kalwan

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचनेनुसार सप्तशृंगी देवीच्या गडावर भाविक व देवस्थानचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी टोलनाक्या समोरील नडगी नाला परिसरात धरण बांधण्यासाठी वनविभागाकडून जागा मंजूर झाली आहे. त्या आधारे जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांनी जागेची पाहणी केली आहे. लवकरच निधी मंजूर होऊन काम सुरु होणार आहे.

राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली झाल्यानंतर जळगाव जिल्हा पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी माजी उपसरपंच गिरीश गवळी व उपसरपंच राजेश गवळी यांच्यासह ग्रामस्थांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन नडगी नाला परिसरात नवीन 3 टिमसी धरण बांधावे अशी मागणी निवेदन देऊन केली होती.

गवळी बंधू, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांची मागणी लक्षात घेऊन पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा विभागाला सूचना करीत तत्काळ सर्वे करून अहवाल सादर करण्याचा सूचना केल्या होत्या.

त्यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, सहाय्यक अभियंता तन्मय कांबळे, सहाय्यक अभियंता व्ही. एस. टिळे, शाखा अभियंता सुनिल चौरे यांनी सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गिरीश गवळी व उपसरपंच राजेश गवळी यांचेसह त्यांनी पाहणी केली.