समस्या दिंडोरीची: ढकांबे, चाचडगाव टोलनाक्यावर वाहनचालकांना भुर्दंड

समस्या दिंडोरीची: ढकांबे, चाचडगाव टोलनाक्यावर वाहनचालकांना भुर्दंड

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

महामार्गावर अपघातावेळी अथवा इतर कारणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतुन (Traffic jam) सुटका करण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना लवकरात लवकर उपचारासाठी तात्काळ मदतकार्य करणारे देवदूत म्हणून वाहतुक पोलीसांना (Traffic police) ओळखले जाते.

परंतु नाशिक (nashik) - कळवण (Kalwan) रोडवरील ढकांबे (Dhakambe) येथील बंद पडलेला टोलनाका तसेच नाशिक (nashik) - पेठ (peth) रोडवरील नव्याने सुरू होणार असलेल्या चाचडगाव सारख्या टोलनाक्यावरील वाहतूक पोलिसांकडून अवैध वाहतूक (Illegal traffic) ऐवजी वाहनधारकांना सर्रासपणे त्रास देत असुन संताप व्यक्त केला जात आहे. हे वाहतूक पोलीस आहेत की वसुली पोलीस? असा संतप्त सवाल विचारला जात असुन सर्वसामान्य वाहनधारकांना सुरू असलेला त्रास तात्काळ थांबवावा अशी मागणी केली जात आहे.

सध्या महामार्गावर वाहतूक पोलीसांचा वाढता पहारामुळे अवैध वाहतूक ऐवजी सर्वसामान्य वाहनधारकांना अधिक त्रास होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनाने प्रवास करणार्‍या वाहनचालकांकडे ठोकळ मानाने वाहतूक परवाना (Transport license), वाहनाचे दस्ताऐवज नसल्यास तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास कारवाई केली जाते. परंतु, यातील कुठल्याही नियमांचा भंग न करणार्‍या वाहनचालकांना धमकावून तुम्ही हुज्जत घालू नका अन्यथा कोणतेही कारण नसतानाही त्रुटी काढून तुमच्याकडून दंड (Fine) वसूल करू अशा पद्धतीने धमकाविण्याचा अजबगजब कारभार वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे.

सर्वसामान्य नागरिक करोनामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीने बेजार झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेल्या होत्या. यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झाल्याने आता कुठं त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. व्यापारी, लहानमोठे व्यावसायिक, रोजंदारी मजूर व सर्वच क्षेत्रातील लोकांचे हाल बेहाल आहेत. मात्र, अशाही विषम वातावरणात मिळेल तसे काम करून रोजगार करणार्‍या लोकांना दुसरीकडे पोलीस त्रास देत असल्याचे दिसून येते.

करोनाविरुद्धच्या (corona) लढ्यात पोलिसांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, यात दुमत नाही. परंतु, पोलीस विभागातील काही कर्मचारी विनाकारण नागरिकांना वेठीस धरीत असल्याचे दिसून येते. नाशिक - कळवण, नाशिक - पेठ हा मार्ग वर्दळीचा आहे. या भागातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या मार्गाने जाणार्‍या सामान्य वाहनधारकांना मात्र हे ट्रॅफिक पोलिस नाहक त्रास देत असल्याचे दिसून येते. येणार्‍या जाणार्‍या वाहनचालकांना अडवून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आपले खिसे कसे गरम करता येईल, यासाठी ते सावज शोधताना दिसून येतात.

वाहनधारकाकडे वाहतूक परवाना व इतर सर्वच प्रकारचे दस्ताऐवज असल्यावरसुद्धा त्याला नाहक थांबवून ठेवणे, धमकावणे असे प्रकार सुरू आहेत. गुजरात, सापुतारा, सप्तश्रृंगी गड अशा तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळी जाण्यासाठी परराज्यातील नागरीकांचीही रेलचेल मोठ्याप्रमाणात चालू असते. परंतु नंबरप्लेट नुसार स्थानिक एम.एच.15 च्या व्यतिरिक्त इतर गाड्यांना अडवले जाते. परराज्यातील वाहनधारकांना तर हमखास अडवले जाते. व तासंतास त्यांच्याशी हुज्जत घातली जाते.

इतर कोणत्याही राज्यात अथवा इतर महामार्गावर जो अनुभव मिळत नाही तो कटु अनुभव ढकांबे तसेच चाचडगाव टोलनाक्याजवळील महामार्गावर कटु अनुभव अनुभवायला मिळत आहे. येथे नेमकी असली तपासणी केली जाते? वाहनांची तपासणी असेल तर आतापर्यंत रीतसर किती दंड आकारला गेला? अवैध वाहतूकीवर किती कारवाई झाली? यांचीही माहिती जाहीर होणे आवश्यक आहे. विनाकारण वाहनधारकांना त्रास देण्याची प्रवृत्ती नक्कीच चुकीची असुन या चुकीच्या प्रवृत्तीला लवकरच आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

चुकीच्या प्रवृत्तीला आळा बसवा

विनाकारण वाहनधारकांना अडवून त्यांच्यावर जोपर्यंत वसुलीचे कारण सापडत नाही, तोपर्यंत प्रश्नांची सरबत्ती करून वसुली करण्याच्या तक्रारी येत आहेत. अवैध वाहतुकीला आळा घालण्यापेक्षा त्यांना सोयीस्कर हप्ता ठरवुन वसुली करण्यात येते. त्या वाहनांच्या क्रमांका व्यतिरिक्त इतर वाहनांना अडवले जाते अशीही चर्चा असून यातील सत्यता वरिष्ठ स्तरावरून पडताळण्याची आवश्यकता आहे. तासनतास परराज्यातील पर्यटकांना अडवले जाते. विशेषत लहान मुले, स्त्रिया यांनादेखील यामुळे रस्त्यावर उभे राहावे लागते. यामुळे आपल्या राज्याबरोबर जिल्ह्याचीही बदनामी होत असुन याकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कर्तव्यदक्ष व सर्वसामान्य जनतेचे कैवारी म्हणून प्रचलित असणारे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी याकडे स्वतः लक्ष देवून या चुकीच्या प्रवृत्तीला आळा बसविण्याची मागणी केली जात आहे.

विनाकारण वाहनधारकांना सुरू असलेला त्रास नक्कीच चुकीचा आहे. परराज्यातील वाहनधारकांना मिळत असलेल्या कटु अनुभवाची चर्चा झाल्यावर नक्कीच आपल्या राज्याची बदनामी होते नक्कीच अशोभनीय आहे. अवैध वाहतूकीवर कारवाई होण्याऐवजी वाहनधारकांनाच विनाकारण त्रासाला सामोरं जावं लागते हे कुठेतरी थांबलेच पाहिजे. चुक करणार्‍यांवर नक्कीच करवाई करा परंतु विनाकारण नको त्या कारणासाठी वाहनधारकांना त्रास थांबविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

- माधवराव साळुंके, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com