पावसाच्या जोरदार हजेरीने पिकांना जीवदान

दुबार पेरणीचे सावट दूर
पावसाच्या जोरदार हजेरीने पिकांना जीवदान

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगावसह बागलाण, देवळा ( Malegaon, Devla, Baglan ) आदी तालुक्यात बहुतांश गावांमध्ये पावसाचे ( Rain ) दमदार आगमन झाल्याने चिंताक्रांत शेतकर्‍यांना ( Farmers ) अखेर दिलासा मिळाला. पावसाने अनेक दिवस दडी मारल्याने खरीप पिके करण्यास प्रारंभ झाल्याने दुबार पेरणीच्या भीतीने धास्तावलेल्या शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले होते.

गत दोन दिवसापासून उघडकीप घेत पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले असून समाधानकारक पावसामुळे शेतकर्‍यांनी मका, सोयाबीन आदी पिकांच्या पेरण्यांना तसेच भात लावणीस प्रारंभ केला आहे. प्रारंभीच्या पावसाने मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारी आदी पेरणी झालेल्या पिकांसाठी हा पाऊस लाभदायी ठरणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

रोहिणी पाठोपाठ मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने यंदा समाधानकारक पाऊस पडेल या आशेवर मालेगाव तालुक्यातील अनेक गावात शेतकर्‍यांनी खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र नंतर पावसाने गुंगारा दिल्याने मका, बाजरी, सोयाबीन आदी पिके संकटात सापडली होती. पावसाच्या आशेवर कोबी, फ्लॉवर, टमाटे, मिरची आदी भाजीपाल्याची लागवड देखील शेतकर्‍यांनी केली होती. मात्र पावसाअभावी ही पिके देखील करपू लागल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले होते. तब्बल 15 ते 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर गत दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावण्यास प्रारंभ केला असल्याने बळीराजा सुखावला आहे.

तालुक्यातील माळमाथा भागाचे प्रमुख पिक असलेल्या कपाशीसह मका, बाजरी, ज्वारी आदी पिकांना जीवदान लाभून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. झोडगे परिसरात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी बांधव उल्हासित झाले आहेत. अजंग, वडेल, वडनेर, खाकुर्डी आदी गाव परिसरात गत तीन-चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी खरीप पेरण्यांना प्रारंभ केला आहे. अनेक शेतकर्‍यांनी पूर्वी झालेल्या पावसावर पेरण्या केल्या होत्या. मात्र पावसाने गुंगारा दिल्याने पिके करपू लागली होती. मात्र या पावसामुळे पिकांना जीवदान लाभल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. सावकारवाडी परिसरात झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान लाभले आहे. दाभाडीसह पिंपळगाव, आघार, जळगाव आदी गावांमध्ये पावसाने अल्पशी का होईना हजेरी लावणे सुरू केल्याने खरीप पिकांना जीवदान लाभले आहे.

बागलाणात शेतकरी सुखावले

सटाणा शहरासह तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. दमदार पावसाच्या हजेरीमुळे खरीप पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मुल्हेर परिसरात दिड ते दोन तास चांगला पाऊस झाल्याने खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला असून पावसाचे पाणी तुंबल्याने भात लावणीस शेतकर्‍यांनी प्रारंभ केला आहे. जोरण परिसरात रात्री झालेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या मका, बाजरी, सोयाबीन, ज्वारी आदी पिकांना जीवदान लाभले आहे. डांगसौंदाणे, मुंजवाड, अंबासन आदी गावांमध्ये देखील पावसाच्या हजेरीमुळे खरीप पिकांना जीवदान लाभले असून कोबी, टमाटे, मिरची आदी भाजीपाला पिकांच्या लागवडीस शेतकर्‍यांनी प्रारंभ केला आहे.

ताहाराबाद परिसरात संकट टळले

ताहाराबाद परिसरात मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिके धोक्यात आली होती. झालेल्या पेरण्या वाया जाणार की काय याची भीती निर्माण झाली होती तर अनेक ठिकाणी पेरण्या खोळबल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला होता. मात्र जुलै महिन्याच्या मध्यात पावसाने दमदार सुरवात केल्याने शेतकरी सुखावले आहे. पावसाळा उशिरा सुरू झाल्याने यंदा अद्याप सर्व नदी नाले कोरडेच आहेत. यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे.

देवळा शहरासह ग्रामीण भागात दमदार पाऊस

देवळा शहरासह तालुक्यात दीड ते दोन तास दमदार पावसाने हजेरी लावल्याने चिंताग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे अनेक गावात दुबार पेरणीचे संकट टळले तर पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाने गुंगारा दिल्याने शेतकर्‍यांसह नागरीक चिंताक्रांत झाले होते. तब्बल दीड ते दोन तास मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com