‘रोहयो’वर मजुरांची उपस्थिती घटली
नाशिक

‘रोहयो’वर मजुरांची उपस्थिती घटली

मजुरांची संख्या मागील पंधरा दिवसात ३० हजारांनी घटली

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

मान्सूनच्या आगमनामुळे शेतीच्या कामांनी घेतलेला वेग व पावसात जलसंधारणच्या कामाच्या मर्यादा यामुळे रोजगार हमीवरील मजुरांची संख्या मागील पंधरा दिवसात ३० हजारांनी घटली आहे. सद्यस्थितित ११ हजार मजुर रोहयोची कामे करत आहे. पुढील काळात पावसाने जोर धरल्यास पेरण्यांना वेग येणार असून रोहयोच्या कामांवरील मजुरांची संख्येत आणखी घट होणार आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभुमीवर मागील २३ मार्चला देशभरात लॉकडाऊन घोषित झाला होता. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाउन सातत्याने वाढविण्यात आला. परीणामी शहरासह ग्रामीण भागात हातावर पोट असलेल्या गोरगरिबांची उपासमार झाली. विशेषत: ग्रामीण भागात जगण्याचा प्रश्न मोठा कठीण बनला होता. या संकटात रोजगार हमी योजना गोरगरिबांसाठी तारणहार ठरली. केंद्र सरकारने रोहयो कामांना परवानगी दिली. त्यात सामुहिक ऐवजी व्यैयक्तित कामांना प्राधान्य देण्यात आले.

जिल्ह्यात या योजनेची कामे सुरु झाल्यावर मजुर उपस्थिती एकाच आठवडयात तीन हजारांहून थेट चाळीस हजारांवर पोहचली. ग्रामीण भागात उपासमारीचा सामना करणार्‍या मजुरांच्या हाताला काम मिळाले. ग्राम पंचायतींबाहेर जॉब कार्ड घेण्यासाठी मजुरांच्या रांगा लागल्या होत्या. घरकुल, शौचालय, वृक्षारोपण, नर्सरी व जलसंधारणची कामे मोठया प्रमाणावर सुरु होती. मात्र आता मान्सूनचे आगमन झाले असून मजुर त्यांच्या घराकडे परतत आहे.

शेतकामांसाठी मजुरांना मोठी मागणी असून त्या ठिकाणी दिवसाला मजुरी जास्त मिळत आहे. तसेच पावसामुळे जलसंधारण कामे बंद झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमीवरील रोजगारांची संख्या झपाटयाने घटल्याचे पहायला मिळते. सद्यस्थितीत जिल्ह्यात रोजगार हमीवर ११ हजार मजुर काम करत असून रोपवाटिका, शौचालय व घरकुल या कामांना प्राधान्य दिले जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com