पोलीसांकडून माणुसकीचे दर्शन!; भल्या पहाटे गरोदर महिलेस पोहचवले दवाखान्यात

पोलीसांकडून माणुसकीचे दर्शन!; भल्या पहाटे गरोदर महिलेस पोहचवले दवाखान्यात

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

पोलीसांकडे केवळ भितीयुक्त नजरेने पाहिले जाते. तसेच चित्रपट, मालिकांमध्ये भ्रष्टाचारी पोलीस दाखवले जातात, परंतु नाशिक पोलीसांनी भल्या पहाटे गरीब, वृद्ध सासु सार्‍यांसह पायी चालत दवाखान्यात निघालेल्या प्रसुती कळा सुरू झालेल्या गरोदर महिलेस दवाखान्यात पोहच करून माणुसकीचे दर्शन घडवले.

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन पवार व पोलीस हवालदार उगले हे नेहमीप्रमाणे रात्र गस्त घालत दुचाकीने पहाटे 3 वाजेच्या सुमारास गंगापूर गाव परिसरात पोहचले. या ठिकाणी एक गरीब कुटुंबातील गरोदर महिला तीच्या सासु सार्‍यांसह पायी चालत जात होती.

भल्या पहाटे तीन व्यक्ती पाहुण पोलीसांनी चौकशीसाठी म्हणुन वाहन त्यांच्यापाशी उभे केले. तेव्हा सदर महिलेस प्रसुती कळा सुरू असल्याचे व पहाटे कोणतेही वाहन मिळाले नसल्याचे त्यांनी पोलीसांना सांगीतले. पवार यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधुन पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांच्या परवानगीने गुन्हे शोथ पथकाची व्हॅन पाठवण्याची विनंती केली.

पथकाचे पोलीस नाईक गिरीष महाले, राहुल सोळसे यांनी तात्काळ गंगापूर गाठून सदर महिलेस व तीच्या सासु सासर्‍यांना गिरणारे ग्रामिण रूग्णालयात दाखल केले. पोहचल्यानंतर पहाटे अवघ्या 20 मिनीटात महिलेची प्रसुती होऊन तीने गोंडस मुलीला जन्म दिला.

गंगापूर पोलीसांच्या या माणुसकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलीस आयुक्त दिपक पांडे, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त दिपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अंचल मुदगल यांनी सर्व कर्मचार्‍यांना दुरध्वनी करून कौतुक केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com