ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित

तारुखेडले, तामसवाडी परिसरात 600 कृषीपंप बंद
ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा खंडित

करंजीखुर्द । वार्ताहर Karanji Khurd

थकीत वीजबिलाचे ( Electricity Bills ) नावाखाली वीजवितरण कंपनीने गोदाकाठ भागातील तारुखेडले, तामसवाडी, करंजीखुर्द, ब्राम्हणवाडे, झुंगे बेट आदी परिसरातील सुमारे 40 च्या आसपास ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा खंडित ( Transformer Power Supply Cut off) केल्याने यावर अवलंबून असलेल्या जवळपास 600 शेतकर्‍यांचे कृषीपंप ( Agricultural pump ) बंद पडल्याने हातात आलेली मका, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला पिके पाण्याविना जळू लागली आहे.

त्यातच सध्या कोणत्याच शेतीपिकाला भाव नसल्याने शेतकर्‍याची आर्थिक कोंडी झालेली असतांनाच आता वीजवितरण कंपनीची यात भर पडल्याने शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हातात आलेली पिके वाचविता यावी यासाठी वीजवितरण कंपनीने काही महिने शेतकरी हित जपत दिलासा देणे गरजेचे आहे.

वीजबिल थकल्याने वीजवितरण कंपनीने तामसवाडी शिवारातील 14, तारूखेडले शिवारातील 12, करंजी खुर्दचे 4 ट्रान्सफार्मर बंद केले.

गेल्या तीन महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांनी वीजबिलापोटी 25 टक्के रक्कम भरली होती. मात्र आता कृषीपंपाचे चालू बिल भरण्यासाठी वीजवितरण कंपनीकडून शेतकर्‍यांना लकडा लावणे सुरू आहे. त्यातच गेल्या आठ दिवसांपासून थेट ट्रान्सफार्मरच बंद करण्यात येत आहे. एका ट्रान्सफार्मरवर अंदाजे 15 ते 20 कृषीपंपांना वीजपुरवठा केला जातो. यातही प्रत्येक ट्रान्सफार्मरवरील दोन-तीन शेतकरी वीजबिल नियमित भरतात. मात्र गव्हाबरोबर किडेदेखील रगडण्याचा प्रकार वीजवितरण कडून सुरू आहे.

तसे पाहता ज्या शेतकर्‍यांनी वीजबिल भरले आहे, त्यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता संपूर्ण ट्रान्सफार्मरचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने या शेतकर्‍यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. गेल्या आठ दिवसांपासून पावसानेदेखील पाठ फिरविली आहे. साहजिकच मका, सोयाबीन, टोमॅटो, भुईमूग, द्राक्षबागा, डाळिंब, भाजीपाला आदी पिकांना पाणी देणे गरजेचे आहे.

मात्र थेट ट्रान्सफार्मर वरूनच वीजपुरवठा खंडित केला गेल्याने पाण्याविना पिके जळू लागली असून जनावरांना पाणी देणे अवघड होत आहे. गोदाकाठच्या याच परिसरात हिंस्त्र श्वापदांचा वावर मोठ्या प्रमाणात असून वस्तीवर राहणार्‍या नागरिकांना विजेअभावी रात्र जागून काढावी लागत आहे. शेतकरी वीजबिल भरण्यास तयार आहे. मात्र आताची शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती तशी नाही. आज कोणत्याच शेतीमालाला भाव नाही. मात्र शेतातील उभी पिके काढून त्याजागी नविन पीके घेण्यासाठी शेतजमीन मोकळी करणे गरजेचे आहे.त्यामुळे अशा बिकटप्रसंगी वीजवितरण कंपनीने शेतकर्‍यांना दिलासा देत वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

डासांच्या प्रमाणात वाढ

गेल्या दहा-पंधरा दिवसांपूर्वी बरसलेल्या पावसामुळे याच परिसरात घाणीचे साम्राज्य आणि डासांच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. त्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. रात्रीच्या वेळेस वीज नसल्याने या परिसरातील नागरिकांना हिंस्त्र श्वापदांबरोबरच डासांपासून रक्षण करणे अवघड होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com