Police
Police|देवळाली कँँम्प वार्तापत्र : गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक हवा
नाशिक

देवळाली कँँम्प वार्तापत्र : गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक हवा

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

देवळाली कँँम्प Deolali Camp l सुधाकर गोडसे

निसर्गरम्य वातावरणाची देण असलेल्या देवळाली कॅम्प शहराचा नावलौकिक जगभर आहे, या शहरातील युवा पिढी सायबर क्राईमसारख्या विविध गुन्हेगारीच्या माध्यमातून वेगळी वाट धरत असल्याने आगामी काळात देवळालीच्या नावलौकिकास धक्का लागण्याची शक्यता आहे.

लष्कराचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र असलेल्या देवळालीच्या परिसरात भगूर देवळाली या शहरासह लहवित, वंजारवाडी, लोहशिंगवे, राहुरी, दोनवाडे, नाणेगाव, संसरी, शिंगवे बहुला हा ग्रामीण भाग मोडतो. सुमारे 17 किलोमीटरचा हा परिसर सुरक्षित राहणे व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणे गरजेचे आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून या पोलीस ठाण्यात सेवक वर्ग अपुरा असल्याने येथिल नागरिक यांनी पोलीस आयुक्त यांना शांतता समितीचे माध्यमातून याची जाणीव करून दिलेली आहे.

पोलिसांची संख्या व येथील लोकसंख्या याचे प्रमाण आज खात्याला डोकेदुखी ठरत आहे. छोटे व शांत पोलीस स्टेशन म्हणून नावलौकिक असलेल्या या पोलीस स्टेशनला गुन्ह्यांचे प्रमाण कमी असून उकल करण्याचे प्रमाण समाधान कारक आहे, तरी एखादा गुन्हा थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतो. त्यामुळे येथील पोलीसबळा बाबद वरिष्ठांकडून होणारे दुर्लक्ष येथील कायदा सुव्यवस्थासाठी अडचणी वाढविणारे आहे.

मागील वर्षी विदेशातील विविध नागरिकांना सायबर क्राईमच्या माध्यमातून फसवणूक करणार्‍या युवकांमध्ये येथील सुशिक्षित व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा भरणा असल्याचे समोर आले होते. पालकांचे होणारे दुर्लक्ष, शाळेतील वातावरण, यामुळे युवा पिढी या मार्गाकडे वळत असल्याचे वास्तव आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात शाळा बंद असल्याने असे गुन्हे कमी झाले असले तरी भविष्यात होणार नाहीत असे कोणी सांगू शकत नाहीत.

पूर्वी पोलीस व नागरिकांमध्ये प्रबोधनाचे उपक्रम राबवून त्या माध्यमातून मुलांवर संस्कार केले जात होते. परंतु खंडोबा टेकडी परिसरात प्रेमीयुगुलच्या गर्दीवर मागील वर्षी निर्भया पथकाने एका आठवड्यात 18 जणांवर कारवाई केली होती. युवकांमध्ये बालवयातच मोबाईलचा वाढता वापर, पालकांचे दुर्लक्ष, शिक्षकांना न जुमानणारे विद्यार्थी यामुळे विद्यार्थ्यांची वृत्ती मौजमजाकडे झुकत असून ही बाब भवितव्यासाठी धोकादायक आहे.

पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या मिशन ऑल आऊट, नाकाबंदी हे उपक्रम राबवणे गरजेचे झालेले आहे. शांत असलेल्या देवळाली अशांत होऊ नये यासाठी छोट्या गुन्हेगारी वर पोलिसांनी वेळीच नियंत्रण ठेवल्यास भविष्यातील मोठे गुन्हे रोखले जातील. गत महिन्यात येथील गुन्हेगारीने उचल खाल्ली होती. खुलेआम युवकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. युनिट 2 च्या गुन्हे शोध पथकाने यातील गुन्हेगारावर कार्यवाही केली होती.

यातून पोलीसांचे निलंबन व बदल्या हे प्रकार झालेत. सध्या येथील पोलीस ठाण्यात वपोनी सुभाषचंद्र देशमुख हे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय येथे महिला पोलीस अधिकारी व सेवक यांची संख्याही वाढवणे गरजेचे आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये येथील पोलिसांनी करोना योद्धा म्हणून बजावलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद असली तरी भुरट्या चोर्‍या व गुन्हेगारी वाढणार नाही त्यासाठी नियमितपणे आपले मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून परिसरात वर्चस्व ठेवले पाहिजे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर हद्दीतील संपूर्ण परिसराची पाहणी करत प्रत्येक गावात पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका घेऊन कायदा सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. काही तडीपार गुंडांना शोधून त्यांना पुन्हा शहराबाहेर पिटाळण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. श्रावण महिन्यातील सण लक्षात घेता शहरात कुठे गर्दी होणार नाही व त्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे सक्रिय होणार नाही, यासाठी पोलिसांनी दक्षता बाळगणे गरजेचे बनले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com