
सिन्नर । प्रतिनिधी | Sinnar
तालुक्यातील ठाणगाव (Thangaon) येथे शुक्रवारी (दि.१७) रात्री ८.३० वाजता जुगार (gambling) अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप (Superintendent of Police Shahaji Umap) यांच्या सुचनेनूसार जिल्हाभरातील अवैध (Illegal) धंद्यांवर धाडसत्र सुरु असून यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सदर पथक ठाणगाव परिसरात गस्तीवर असताना त्यांना गावातील खंडोबा मंदिराजवळील ज्ञानेश्वर बंधारा येथील एका घराच्या आडोशाला काही लोक पैसे लावून जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
त्यानंतर पोलिसांनी (police) बंधारा परिसरात जाऊन बघितले असता एका घराच्या भिंतीच्या आडोशाला पाच ते सात लोक एकत्र बसलेले त्यांना दिसून आले. त्यावेळी त्यांच्याजवळ तीन ते चार लोक उभे होते. पोलिसांची खातरजमा झाल्यानंतर त्यांनी छापा टाकला. मात्र, पोलीस आल्याची चाहूल लागताच ४ जणांनी तेथून पळ काढला.
यावेळी घटनास्थळी रंगेहात पकडलेल्यांमध्ये बाळासाहेब नथु जगताप (५२) यांच्याकडे १ हजार रुपये, सुर्यभान किसन शिंदे (४७) यांच्याकडे ७ हजार रुपये, मयुर बाबुराव शिंदे (२५) यांच्याकडे ४ हजार ५०० रुपये, विलास भाऊसाहेब आव्हाड (३८) यांच्याकडे ११ हजार रुपये, मच्छिंद्र दशरथ शिंदे (४२) यांच्याकडे तब्बल ७२ हजार रुपये तर अमोल कमलाकर आव्हाड (२६) (रा. सर्व ठाणगाव) यांच्याकडे १५०० रुपये व चटईवर पडलेली ३ हजार ६५० रुपयांची रोकड मिळून आली.
तसेच पोलिसांनी त्यांच्याकडून ५२ पत्यांचा कॅट, ८१ हजारांचे ६ मोबाईल व २ लाख ८९ हजारांच्या ५ दुचाकी मिळून त्यांच्याकडून तब्बल ४ लाख ६९ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिसांनी ६ संशयितांना अटक करत सिन्नर पोलिस ठाण्यात आणले.
दरम्यान, पोलिसांनी जिल्हा ग्रामीण मुख्यालयाचे (District Rural Headquarters) शिपाई नितिन जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. त्यानंतर आज (दि.१८) आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम, हवालदार विनोद टिळे, गोरक्षनाथ संवस्तरकर यांचा सहभाग होता.