पोलीस दलाला मिळणार दिलासा

निर्बंध शिथिल होताच बंदोबस्त होणार कमी
पोलीस दलाला मिळणार दिलासा

नाशिक । प्रतिनिधी

राज्य शासनाने करोना पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहर-जिल्ह्यातील लॉकडाऊन निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला असून यात नाशिकचा समावेश आहे. परिणामी गेल्या दीड वर्षांपासून करोनाशी सामना करत रस्त्यांवर उतरलेल्या पोलीस दलाचा ताण कमी होऊन पोलीस अधिकारी तसेच सेवकांंना दिलासा मिळणार आहे.

मार्च 2020 पासून लॉकडाऊन जाहीर होण्याच्या पूर्वीपासून शहर तसेच जिल्हा ग्रामीण पोलिसांनी नागरिकांमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी बंदोबस्त तैनात केला होता. परंतु पहिल्या तसेच दुसर्‍या लाटेतही करोना उद्रेकाचा फटका रस्त्यावरील पोलीस यंत्रणेलाही मोठ्या प्रमाणात बसला असून दुसर्‍या टप्प्यात आतापर्यंत चारशे पेक्षा अधिक अधिकारी व सेवक करोनाबाधित झाले आहेत. तर 8 जणांचा बळी करोनाने घेतला आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर सुरू केले. यामुळे पोलीस कुटुंबियांना दिलासा मिळाला होता.

मात्र पहिल्या करोना लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर ठरली. या लाटेने एप्रिल व मे महिन्यात करोनाबाधित तसेच मृत्यूचे अनेक उच्चांक मोडले. शहर तसेच ग्रामीण भागातील सर्व रुग्णालये तुडुंब भरली. रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड दूर, साधे बेडही मिळणे दुरापास्त झाले होते. अशा वातावरणातही नागरिकांमध्ये झपाट्याने पसरणारा करोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी शहरातील 40 तर ग्रामीण भागातील सीमावर्ती भागात कडेकोट बंदोबस्त करत पोलीस रात्रंदिवस उभे होते.

यासह पोलिसांच्या दैनंदिन कामकाज असलेल्या कायदा व सुरक्षा व्यवस्था याकडेही पोलीस दलाला पुरेसा वेळ तसेच मनुष्यबळ उपलब्ध करता येत नव्हते. परिणामी गुंडांनी मोठ्या प्रमाणात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. कमी मनुष्यबळातही पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. परंतु पोलीस दल विभागल्याने तसेच करोना पॉझिटिव्हचे प्रमाणही मोठे असल्याने उपस्थित पोलिसांवर कामाचा मोठा ताण होता.

करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पोलिसांना त्यांच्या कामावर लक्ष देता येणार आहे. तसेच दैनंदिन कामकाजावर त्याचा गुणात्मक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊन निर्बंध कधी शिथिल होणार, याकडे पोलिसांचे लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com