स्मार्ट सिटीची गती मंदावली
नाशिक

स्मार्ट सिटीची गती मंदावली

राजकीय अडथळे कोण दूर करणार?

Abhay Puntambekar

नाशिक। प्रतिनिधी Nashik

केंद्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या स्मार्ट सिटी अभियानात देशातील विकासाकडे झेपावणार्‍या निवडक शहरांना परदेशांतील अत्याधुनिक शहराच्या पंक्तींत नेऊन बसविण्याचा उद्देश आहे. पॅनसिटी, गावठाण विकास व ग्रीन फिल्ड विकास अशा स्वरुपात नागरिकांना सेवा- सुविधा पुरविण्यासाठी स्मार्ट सिटी कंपनीचे काम सुरू असून येणार्‍या काळात शहराचे रुप पालटणार आहे.

महापालिकेला समांतर यंत्रणा म्हणून काम करीत असलेल्या स्मार्ट सिटी कंपनीला प्रारंभीपासून लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी तीन वर्षात एकुण १ हजार कोटींच्या कामांपैकी अपेक्षित कामे पुढे सरकलेली नाहीत. राजकिय अडथळ्यांमुळे स्मार्ट सिटीची गती मंदावली असून हे अडथळे कोण दूर करणार ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

एक स्वतंत्र लिमीटेड कंपनी म्हणून काम करणार्‍या स्मार्ट सिटीला पहिल्या दिवसापासून महापालिकेतील राजकिय विरोधाचा मोठा सामना करावा लागत आहे. भाजपाकडून सुरू असलेल्या या अभियानाची गती आता राज्यात सरकार बदलल्यामुळे काहीअंशी कमी झाली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत पुनर्विकासांर्तगत करण्यात आलेली कामांतील अनेक कामे ही मनसेना सत्ताकाळात झाल्याचा आरोप आहे. तसेच महाकवी कालिदास कलामंदिर, महात्मा फुले कलादालन, नेहरु उद्यान नुतनीकरण आदी कामांच्या खर्चावरुन देखील आरोप झाले आहेत. त्यानंतर गावठाण विकासांतर्गत पूर्ण झालेला पायलट रोड मोठा वादग्रस्त ठरला.

नाशिक व मखमलाबाद शिवारातील ग्रीन फिल्ड विकास प्रकल्पांतील अडथळे कायम असून हा प्रश्न आता राज्य शासनाच्या दरबारात आहे. गोदावरी घाट सुशोभिकरणांर्तगत सुरु झालेल्या नदीतील कॉक्रीटीकरणमुक्तीच्या कामाला देखील विरोध झाल्यानंतर उशिरा का होईना हे काम सुरू झाले आहे. आता गावठाण अंतर्गत सुरू झालेल्या धुमाळ पॉईंट ते पिंपळपार चौक रस्त्याचे काम विरोधानंतर सुरु झाले आहे.

असे असले तरी आता गोदा प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. तसेच सुरक्षित नाशिक या प्रकल्पांतर्गत शहरात आता २७ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात आले असून लवकरच पहिल्या टप्प्यात ८०० सीसीटीव्ही कॅमरे लावण्यात येणार आहेत. यांच्या निंयंत्रणासाठी इंटीग्रेटेड कमांड कंट्रोल रुमचे काम आता अंतीम टप्प्यात आले असून येथील शहरातील विविध बाबींवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

अशाप्रकारे स्मार्ट सिटीच्या कामांना अनेक कारणांमुळे विरोधाचा सामना करावा लागत असून हे अद्यापही सुरूच आहे. जोपर्यत केद्रांत व राज्यात भाजपा नेतृत्व करीत होता, तोपर्यत विकास कामांना गती होती. आता मात्र राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस, कॉगे्रस यांच्या आघाडीचे सरकार आल्यानंतर स्मार्ट सिटीची कामे एकदमच मंदावली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प हे नाशिकचा चेहरा बदलणारी असल्याने ही कामे तातडीने व्हावी अशी भूमिका नाशिककरांची आहे.

याच दृष्टीने आता मागील वर्षात स्मार्ट सिटीकडून मंजूर झालेली आणि निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे आता करोनाच्या अडथळ्यानंतर सुरू झालेली आहेत. नाशिकचे रुप बदलणार्‍या प्रकल्पाला केवळ विरोधक म्हणून विरोध न करता, यातील त्रुटी दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधींनी प्रकल्पाना गती दिली पाहिजे. यादृष्टीने आता पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा नाशिककरांची आहे.

कंपनीचे प्रकल्प वेळेत पूर्ण करणार

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीकडून गेल्या तीन वर्षात चांगली कामे झाली आहेत. यात गावठाण विकासांतर्गत काही प्रकल्पांचे नुतनीकरणासह कामे झाले असल्याने शहराला नवीन ओळख निर्माण झाली आहे. आता कार्यादेश देण्यात आलेले महत्वाकांक्षी गोदा प्रकल्पासह सहा प्रकल्प आम्ही वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रकाश थविल, सीईओ नाशिक स्मार्ट सिटी कंपनी.

स्मार्ट सिटीची सुरू प्रकल्प (कंसात प्रकल्प किंमत)

गावठाण विकासांर्तगत आधुनिक पाणी पुरवठा, लहान मोठे रस्ते विकास, भूमिगत गटार. कामांचा कार्यादेश दिला.(खर्च २३७.२१ कोटी रु.). गावठाण अंतर्गत गोदाघाट विकास - सुशोभिकरण व पायाभूत सुविधा कामे. कामांचा कार्यादेश दिला. (खर्च - ७३.७२ कोटी रु.) गावठाण विकासांंतर्गत गोदाघाट विकास - भूमिगत गटार व पाणी पुरवठा कामे. कामांचा कार्यादेश दिला.(खर्च ९.४१ कोटी रु.). पंडीत पलुस्कर सभागृह नुतनीकरण. (खर्च २.९८ कोटी रु.). सुरक्षित व सुंदर नाशिक नाशिक. (खर्च ७८.७६ कोटी रु.).

Deshdoot
www.deshdoot.com