
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर संचालक मंडळाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विरोधी गटाचे संचालक शिवाजी चुंभळे यांनी सभापतींनी मनमानी कारभार पुन्हा सुरु केला असून शेतकरी मेला तरी चालेल फक्त ठेक्याच्या निविदा काढून मलिदा खाण्याचा कारभार सुरु झाल्याचा आरोप केला आहे. यावेळी वादग्रस्त विषयांवरून विरोधकांनी आपला विरोध दर्शवत सभा बेकायदेशीर असल्याचे आणि सभेतील सर्व विषयांना आपला विरोध असल्याचे लेखी पत्र देत सभात्याग केला.
बाजार समितीच्या आवारात नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या सभेच्या वृत्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे सभेत नेमके शेतकरी हिताचे काय निर्णय घेण्यात आले हे समजू शकले नाही.तसेच, सभापती देवीदास पिंगळे यांनी याबाबत कुठलीही अधिकृत माहिती माध्यमांना दिली नाही. मात्र, अकरा वाजता सुरु झालेल्या सभेतून बारा वाजेच्या सुमारास विरोधी गटाचे संचालक शिवाजी चुंभळे, कल्पना चुंभळे, राजाराम धनवटे, प्रल्हाद काकड, तानाजी करंजकर, धनाजी पाटील यांनी सभागृहाबाहेर येत सभेमध्ये असलेल्या सर्व विषयांना आपला विरोध असल्याचे सांगितले. तसेच, याबाबतच्या विरोधाचे पत्र बाजार समिती सचिव, सभापती, पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक यांना दिल्याचे सांगितले.
या सभेत नवीन कर्मचार्यांची भरती करण्यात येणार असल्याचा विषय ठेवण्यात आला होता. याबाबत विरोधकांनी पहिले जुन्या कर्मचार्यांना सहावा वेतन आयोगाचा फरक देऊन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करीत त्यांना पैसे भेटल्यास जुनेच कर्मचारी तळमळीने काम करतील आणि नव्याने कर्मचारी भरण्याचा प्रश्नच येणार नसल्याने आर्थिक भार बाजार समितीच्या तिजोरीवर पडणार नसल्याचे सांगितले.तसेच,सभापती, उपसभापती यांना असलेले अधिकार कायद्याचा भंग करून पणन संचालकांच्या मान्यतेशिवाय इतर कोणत्याही सदस्यांकडे सोपवू नये.तसेच, निधी खर्च करताना शासन, वरिष्ठ कार्यालय आणि न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन होणार नाही,याची दक्षता घेण्याचे सांगण्यात आले.
त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील बाजार समितीच्या बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला घेऊन सर्व कायदेशीर पूर्तता झाल्यानंतर मार्केटचे उदघाटन करण्यात यावे, 29 वर्षाच्या दीर्घ करारावर गाळे भाड्याने देऊ नये.यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडील एकरकमी कर्ज फेड योजनेची माहिती द्यावी, कर्ज किती घेतले, का थकले, नियमित कर्जाचे हप्ते भरले असते तर किती रक्कम भरावी लागली असती आणि आता किती रक्कम भरावी लागणार आहे. आणि त्यामुळे बाजार समितीचे किती आर्थिक नुकसान होणार आहे. याची माहिती नवनिर्वाचित सदस्यांना द्यावी,अशा मागण्या करीत आपल्या विरोधाचे पत्र देण्यात आले आहे.
सभेला सभापती देवीदास पिंगळे, उपसभापती उत्तमराव खांडबहाले, चंद्रकांत निकम, विनायक माळेकर, जगदीश अपसुंदे, युवराज कोठूळे, सविता तुंगार, निर्मला कड, जगन्नाथ कटाळे, भास्कर गावित, संपत सकाळे, संदीप पाटील, शिवाजी चुंभळे, कल्पना चुंभळे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, राजाराम धनवटे, प्रल्हाद काकड आदी उपस्थित होते.
शेतकर्यांना मारहाण झाली त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. सुरक्षारक्षक धष्टपुष्ट ठेवावे, ड्रेसकोड लागू करावा, बाहेरच्या लोकांना मज्जाव करावा.आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये यापुढे भ्रष्टाचार होऊ देणार नाही.
- शिवाजी चुंभळे, संचालक