कांदा प्रश्न आज कॅबिनेटमध्ये मांडणार

कडू यांचे आश्वासन
Onion
Onionकांदा प्रश्न आज कॅबिनेटमध्ये मांडणार

नाशिक । Nashik प्रतिनिधी

राज्य सरकारने जबाबदारी घेऊन प्रतिक्विंटलमागे 300 ते 500 रुपये अनुदान कांदा उत्पादकांना द्यावे, याबाबत आपण उद्या मंगळवारी वा बुधवारी (दि.5) कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडू, असे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिले.

कांदा पीक दरवर्षी कोणत्या ना कोणत्या अडचणीत सापडत आहे. यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी दराने उन्हाळ कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

केंद्र सरकारच्या मदतीची वाट पाहण्यापूर्वी राज्य सरकारने जबाबदारी घेऊन प्रतिक्विंटलमागे 300 ते 500 रुपये अनुदान कांदा उत्पादकांना द्यावे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

जिल्ह्यातील येवला, चांदवड, निफाड व नाशिक तालुक्यातील प्रहार शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्री कडू यांची कुरळ पूर्णा (जि.अमरावती) येथे भेट घेऊन कांदा उत्पादकांची स्थिती मांडली.

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर, जिल्हाप्रमुख शरद शिंदे, येवला तालुकाप्रमुख हरिभाऊ महाजन, किरण चरमळ, रेवण गांगुर्डे, चांदवड तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण, दीपक जाधव, संदीप जाधव आदी उपस्थित होते.

‘भरपाई मिळवून देणार’

हवामान बदल व कांद्याची टिकवण क्षमता कमी झाल्यामुळे चाळींमधील खराब झालेल्या कांद्याचे पंचनामे करून, उत्पादकांना योग्य मोबदला व नुकसान भरपाई कशी देता येईल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन कडू यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com