कोट्यवधींचा कांदा अखेर सडला

नाफेडतर्फे खरेदी; कांद्याचे पैसे थकल्याने उत्पादक हवालदिल
कोट्यवधींचा कांदा अखेर सडला

मनमाड । बब्बू शेख | Manmad

भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी नाफेडने खरेदी केलेल्या कांद्यापैकी (onion) सुमारे 60 टक्के पेक्षा जास्त कांदा खराब झाला असल्यामुळे

केंद्र शासनाला (central government) कोट्यावधी रुपयांचा फटका बसला आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांकडून (farmers) कांदा खरेदी करण्यात आला त्यापैकी अनेक शेतकर्‍यांचे पैसे थकल्यामुळे कांदा उत्पादक (Onion grower) शेतकरी देखील आर्थिक संकटात (Financial crisis) सापडल्याने हवालदिल झाले आहेत.

कांद्याची थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी शेतकर्‍यांतर्फे केली जात असून ज्या अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे कांदा सडला (onion rotted) त्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनेने (Farmers Association) केली आहे. दरम्यान, बदलत्या हवामानाचा (climate change ) फटका चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला देखील बसून तो सडू लागल्याने उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्याकरिता ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Protection) भाव स्थिर योजनेंतर्गत केंद्र शासनाने (central government) नाफेडला शेतकर्‍यांकडून कांदा खरेदीचा आदेश दिल्यानंतर नाफेडने राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्याचे 16 महासंघ आणि 4 सहकारी संस्थाच्या माध्यमातून एप्रिल ते जुलै दरम्यान तब्बल 350 कोटी रुपयांचा अडीच लाख मेट्रीक टन कांदा खरेदी केला होता.

खरेदी करून ठेवलेला हा बफर स्टॉक कांदा (Buffer stock onion) ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान राज्य आणि केंद्र शासीत प्रदेशात शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून बाजारात पाठविला जाणार होता. मात्र बदलत्या हवामानाचा फटका साठवणूक केलेल्या कांद्याला बसला असून सुमारे 60 टक्के कांदा खराब झाला असल्यामुळे केंद्र शासनाचे कोट्यावधी रुपये वाया गेल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे.

एकीकडे कांदा (onion) खराब झालेला असतांना दुसरीकडे ज्या शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी करण्यात आला त्यापैकी हजारो शेतकर्‍यांचे पैसे नाफेडकडे थकले आहे. कांदा खरेदी केल्यानंतर किमान 8 ते 10 दिवसात शेतकर्‍याच्या खात्यात जमा होत होते मात्र अडीच महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर देखील अनेक शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहे.

केवळ शेतकरीच नव्हे तर ज्यां कंपन्यांनी एजंटमार्फत शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी करून त्यांच्या गोडावूनमध्ये साठवून ठेवण्यात आला होता त्यांना देखील कांदा खराब झाल्यामुळे फटका बसला आहे. साठवणूक केलेल्या कांद्यापैकी ए ग्रेड कांदा 50 टक्के तर बी ग्रेड कांद्याची 75 टक्के रिकव्हरी देण्याची जबाबदारी या कंपन्यांवर असते.

मात्र सध्या कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे नियमानुसार जेवढी रिकव्हरी द्यावी लागते तेवढी देणे या कंपन्यांना शक्य नसल्याने शेतकरी उत्पादक कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. एकूणच बदलत्या हवामानाचा फटका केंद्र सरकार, कांदा खरेदी करणार्‍या कंपन्या आणि शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात बसला असून तिकडे चाळीत साठवून ठेवलेला कांदा देखील खराब होत असल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटाने चिंताक्रांत झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com