अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव

अंनिसने उधळला अंधश्रद्धेचा डाव

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आपल्या किंवा आपल्या कुटुंबावरील विघ्न दूर व्हावे किंवा इतरांवर ते विघ्न यावे या किंवा तत्सम हेतूने सात कैर्‍या अन् सात दगडांची रस्त्याच्या कडेला उतारा मांडून अंधश्रद्धा पसरविणार्‍या अज्ञातांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्‍यांनी डाव उधळला. यावेळी पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत कैर्‍या या उतार्‍यासाठी नव्हे तर मानवी खांद्यासाठीच असतात, असा संदेश देत त्याचा चवीने आस्वादही घेतला. तसेच परिसरातील नागरिकांना अशाप्रकारच्या कृती या अंधश्रद्धा असून, त्यास कोणीही बळी पडू नये असा संदेशही दिला.

सातपूर, सोमेश्वर कॉलनी परिसरात चारचाकी पार्क केल्या जात असलेल्या रस्त्याच्या कडेला अज्ञातांनी पानांवर सात कैर्‍या अन् दगड ठेवून त्यावर हळद-कुंकू टाकले होते. तसेच तिथे नैवेद्यही ठेवण्यात आला होता. चारचाकी पार्किंगच्या जागेवर अशाप्रकारे कोणी पूजा केली असावी?, यामागचा नेमका हेतू काय?, करणीचा तर हा प्रकार नसावा ना? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये विशेषत: महिला वर्गात चर्चिले गेले.

काहींनी तर हा ‘ब्लॅक मॅजिक’चा प्रकार असावा असाही संशय व्यक्त केला. आश्चर्याची बाब म्हणजे नागरिकांनी याठिकाणी वाहने पार्किंग करणेही टाळले. यासर्व प्रकाराचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, महेंद्र दातरंगे, कोमल वर्दे, यशदा चांदगुडे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यावेळी परिसरातील नागरिकांना बोलावून त्यांचे प्रबोधन केले. अशाप्रकारच्या उतार्‍यामुळे समाजात अंधश्रद्धा पसरत असून, यातून काहीही साध्य होत नसल्याची बाब अंनिसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना पटवून दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com