दे. कॅम्प । वार्ताहर

नाशिक तालुक्यातील पूर्व भागात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून पळसे गावात एकाच दिवशी 15 बाधित आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण परिसरात लॉकडाऊन करण्यासाठी ग्रामपंचायत पावले टाकत आहे.

नाशिक तालुक्यातील पळसे गाव परिसरातील जवळपास 49 नागरिकांची करोना चाचणी नुकतीच उपआरोग्य केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. पहिल्याच दिवशी चाचणीनंतर 15 बाधित रुग्ण आढळ्याने एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायतीच्या वतीने मास्क लावण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. मास्क न लावणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरपंच सुरेखा गायधनी यांनी देत नागरिकांनी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोनाने देशभरात थैमान घातले असून एक वर्ष लोटूनदेखील करोना जात नाही हे एक सत्य असले तरी तो घालवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:सह परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. गरज असेल तरच बाहेर पडावे, मास्क लावावे, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवावे, डोळ्याला व नाकाला हात लावू नये, अशा अनेक सूचना ग्रामपंचायत प्रशासन, तलाठी कार्यालय व पोलीसपाटील यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

गावात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन होतो की काय अशा चर्चांनी मात्र जोर धरला आहे. तर पळसे, शिंदे, जाखोरी, चांदगिरी या गावांमध्ये शनिवारी व रविवारी शंभर टक्के बंद पाळण्यात आला असून किराणा दुकाने, भाजीपाला, मेडिकल स्टोअर्स अशी अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत.

नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी. मास्कचा वापर करावा. संपूर्ण गाव परिसरात सॅनिटायझर फवारण्यात येणार असून करोनाबाधित क्षेत्रात कोणीही जाऊ नये. विनामास्क फिरू नये. नियमाचे उल्लंघन केल्यास ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येऊन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

नवनाथ गायधनी, युवासेना तालुकाध्यक्ष