देवळालीत करोना रुग्णांची संख्या वाढली
नाशिक

देवळालीत करोना रुग्णांची संख्या वाढली

एकाच दिवशी २७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

कॅन्टोन्मेंट हद्दीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रशासन व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉकडाऊन सारखा प्रयोग पुन्हा देवळालीत होणार का याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

परिसरात मे महिन्यानंतर करोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. जूनमध्ये दररोज एक ते दोन रुग्ण आढळून येत असताना काल जुलैच्या दुसर्‍या पंधरवड्यात एकाच दिवशी तब्बल २७ रुग्ण आढळून आले. यापूर्वी प्रशासनाने १९ कंटेनमेंट झोन निर्माण करून विविध परिसर सील केला होता. लागोपाठ पंधरा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले असता व्यापारी व नागरिकांनी ते कमी करणेबाबत प्रशासनाकडे खा. हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पाच दिवस आधीच लॉकडाऊन मागे घेण्यात आला.

बाजारपेठेत शासकीय नियमांचा अवलंब सुरू करण्यात आला. मात्र मोकाट फिरणार्‍या नागरिकांमुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनासह पोलीस सेवक देखील हतबल झाले. बुधवारी शहरात सत्तावीस रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन देखील चिंतेत पडले आहे. सध्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात रुग्णांची व्यवस्था करण्यात आलेली असून आजमितीस ६७ रुग्ण पॉझिटिव्ह आहे. पैकी १४ रुग्णांना संदीप फाऊंडेशनच्या गोविंद केअर सेंटरला हलविण्यात आले आहे. तर काही रुग्ण आपल्या सोयीनुसार खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले आहेत.

देवळातील वाढता प्रादुर्भाव चिंताजनक असल्याने शहरात पुन्हा कडेकोट लॉकडाउन करणे गरजेचे बनले आहे. याबाबत प्रशासन काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून शहरात औषध फवारणीसह आरोग्य सेविकांच्या माध्यमातून घरोघरी तपासणी सुरू केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com