नाशिक। वैभव कातकाडे Nashik
करोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता गेल्या वर्षी लॉकडाऊन होते; तरी देखील जानेवारी ते ऑगस्ट या काळात 246 गुन्ह्यांची नोंद Crime record झाली होती तर त्यापैकी 37 गुन्हे उघडकीस आले होते. तुलनेने यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या काळात 23 ने वाढ होत 269 गुन्हे दाखल झाले असून यापैकी फक्त 35 गुन्हे उघडकीस आले आहेत.
शहरातील भद्रकाली, सरकारवाड्यासह उपनगरांमधील मुंबई नाका, पंचवटी, सातपूर, सिडकोसह इंदिरानगरमध्येही चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शहर व परिसरात करोना प्रतिबंधात्मक नियम अन् निर्बंध शिथिल होताच सर्व दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याने वर्दळही वाढली आहे. शहरामधील गजबजलेल्या भागांमधून चोरट्यांनी दुचाकी लांबविण्याचा सपाटा सुरू केला आहे. शहरात मागील दोन महिन्यांच्या कालावधीत दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली bike thieves increased in the city असून चोरट्यांनी इमारतीच्या पार्किंगसह सार्वजनिक ठिकाणांहून दुचाकीचोरीचा सपाटा लावला आहे.
आकडेवारीवरून गुन्हे उघडकीस करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात रोज घडणार्या दुचाकीचोरीच्या घटनांच्या तुलनेत पोलिसांकडून चोरट्यांवर कारवाई करून पकडण्यात येणार्या दुचाकींचे प्रमाण अत्यल्प आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात 269 गुन्हे नोंदवले आहेत; यापैकी फक्त 35 गुन्हे उघडकीस आल्याने दुचाकीचोरी हा चिंतेचा विषय ठरत आहे.
एकदा दुचाकी हरवली तर नागरिकांनी ती विसरूनच जावी, अशी गत नागरिकांची झाली आहे. अनेक नागरिकांना त्यांची चोरीला गेलेली वाहने पुन्हा मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांमध्येच शहर पोलिसांबद्दल नाराजी आहे.
अल्पवयीन चोरट्यांचे प्रमाण जास्त
दुचाकी चोरी प्रकरणात अल्पवयीन चोरांचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. यामागे काही प्रमाणात शिक्षणाचा अभाव आर्थिक तसेच सामाजिक कारणेही अंतर्भूत आहेत. सामाजिक परिस्थितीमुळे निडर झालेला एक वर्ग या सारखे गुन्हे करत असल्याने समाजामध्ये एक चिंतेचा विषय बनलेला आहे.