नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

शेतकरी ते थेट ग्राहक भाजीपाला विक्रीचे नवीन नाशकातील मुख्य ठिकाण म्हणून शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथील छत्रपती शिवाजी भाजी मार्केटची ओळख आहे. ऐंशीच्या दशकात या भाजीमार्केटची स्थापना करण्यात आली.

लोकसंख्या व परिसर वाढीमुळे सदर भाजी मार्केटच्या समोरच्या मोकळ्या परिसरात आजूबाजूच्या परिसरातील लहान-मोठे शेतकरी आपला शेतमाल दोन पैसे चांगले मिळतील या हेतूने येथे रस्त्यावर विक्री करू लागले. भाजी मार्केटच्या समोरील बाजूस सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या भाजीबाजाराला सुट्टीच्या दिवशीच म्हणजे शनिवार व रविवारी यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते.

सुट्टीच्या दिवशी शॉपिंग सेंटर वरून सुरू झालेला भाजीबाजार थेट लेखानगर पर्यंत भरला जातो. भाजीपाल्या सह, फळ विक्रेते व इतर गृहोपयोगी वस्तूची विक्री करणारे याठिकाणी रस्त्यावर आपले दुकान मांडून बसलेले असतात. हातावर पोट भरणार्या लोकांसाठी उपजीविकेचे चांगले साधन याठिकाणी निर्माण झाले आहे. या ठिकाणी फक्त सकाळच्या वेळात हा भाजीबाजार भरत असला तरी मुख्य भाजी बाजार हा सायंकाळी देखील सुरू असतो, यामुळे या ठिकाणी सतत वाहतूककोंडी होत असते. याचा मनस्ताप स्थानिक रहिवासी व इतर वाहनचालकांना सहन करावा लागतो.

मनपा प्रशासनाने या ठिकाणी बर्याचदा अतिक्रमण मोहीम राबवल्या आहेत. आतापर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत येथील भाजीपाला विक्रेते शेतकरी व अन्य विक्रेत्यांचा भाजीपाला थेट जमा करण्यात आला, व तो विक्रेत्यांना परत दिला गेला नाही. हा जमा केलेला भाजीपाला नक्की गेला कुठे ? हा प्रश्न मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याठिकाणी मनपाने अतिक्रमण मोहीमे ऐवजी इतर मोहीम राबवून भाजीपाला विक्रेत्यांशी समन्वय साधून येथील वाहतूक कोंडी व परिसराची स्वच्छता या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मनपा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने देखील येथील भाजी मार्केटच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करणे गरजेचे आहे. येथील विक्रेते हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी व्यवसाय करीत असतात त्यांना होणारा उपद्रव दूर होणे गरजेचे आहे. अतिक्रमण मोहीम हा यासाठी पर्याय ठरत नाही. यासोबतच स्थानिक रहिवाशांना रोजचा होणारा मनस्ताप दूर करणे देखील गरजेचे आहे.

सावळीराम तिदमे, ज्येष्ठ नागरिक