करोना बाधितांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज
नाशिक

करोना बाधितांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज

तक्रारींचे निवारण करा; सकस आहार द्या : खा.डॉ. पवार यांचे निर्देश

Abhay Puntambekar

मनमाड । प्रतिनिधी

करोना बाधीत रूग्णांवर काळजीपुर्वक उपचार झाले पाहिजेत. तसेच त्यांचे मनोधैर्य कसे टिकून राहिल याकडे देखील आरोग्य विभागाने विशेष लक्ष द्यावे. सकस आहार देण्याबरोबरच योगचे प्रशिक्षण दिले पाहिजे. रूग्णांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करा, अशा स्पष्ट सुचना खा.डॉ. भारती पवार यांनी येथे बोलतांना दिल्या.

मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यात करोनाचे संक्रमण फैलावत असल्याने बाधितांची रूग्ण संख्या व्दिशतकावर जावून पोहचली असल्याने आरोग्य यंत्रणेसह जनतेत चिंतेचे सावट पसरले आहे. बाधितांची संख्या दररोज वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. त्याचा फटका बाधीत रूग्णांना बसत असल्याने या संदर्भात तक्रारी खा.डॉ. पवार यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. याची गंभीरतेने दखल घेत खा.डॉ. पवार यांनी येथील करोना उपचार केंद्रास काल अकस्मात भेट देत पाहणी केली.

यावेळी पवार यांनी डॉक्टरसह इतर संबंधित अधिकार्‍यांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. रूग्णांच्या नातेवाईकांनी केलेल्या काही तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे खा.डॉ. पवार यांच्या निदर्शनास आले. तत्काळ सेवेसाठी १०८ रुग्णवाहिकाची नितांत गरज आहे. तेथील रुग्णांना डिस्चार्ज करतेवेळीही हलगर्जीपणा केला जातो, असे प्रकार घडू नयेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी वैद्यकिय अधिकार्‍यांना दिले.

करोना उपचार केंद्रास भाजपतर्फे लवकरच स्टीमर उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती देत डॉ. पवार यांनी रुग्णासाठी योगा सुरू करावा त्यासाठी मागणी केल्यास योगा स्वयंसेवक उपलब्ध करून दिला जाईल. रुग्णांना दररोज सकस आहार द्यावा, स्वच्छतेची काळजी घ्यावी. रुग्णांना कुठलीही अडचण न येता योग्य काळजीपूर्वक उपचार झाले पाहिजे तसेच या दरम्यान त्यांचे मनोधैर्य कसे टिकून राहील याकडेही लक्ष देण्याच्या सूचना खा.डॉ. पवारांनी केल्या.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, सचिन दराडे यांच्यासह कांती लुनावत, राजेंद्र पवार, नितीन आहेरराव, अकबर शहा, डॉ. रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com