
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह (Dr. Rajendra Singh) जिल्हा दौऱ्यावर येत असून दि.२२ व २३ फेब्रूवारी असे दोन दिवस त्यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्याची सरपंच परिषद, चला जाणूया नदीला (Chala Januya Nadila) या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत नदी यात्रेचा शुभारंभ, तसेच पर्यावरण संवर्धनातील महत्वाचे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत...
या दौऱ्यात बुधवारी (दि.२२) येवला तालुक्यातील कुसमाडी येथे त्यांच्या हस्ते ‘चला जाणुया नदीला’ या महाराष्ट्र शासन व जलबिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील १०८ नद्यांच्या सर्वोक्षण तथा पुनरूज्जीवन कार्यक्रमांतर्गत मोती नदीच्या उगमस्थानी नदीचे पूजन, कच्चे बंधारे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी ५ वाजता बेलगाव ढगा येथे नंदिनी नदीच्या पाणलोटाची व तिथल्या पर्यावरण संवर्धन कामाची डॉ. राजेंद्र सिंह पाहणी करतील. सायंकाळी ६-३० ते ८ परमानंद स्पोर्टस अॅकॅडमी येथे नीर नारी नदी हा पर्यावरणीय नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
गुरूवारी (दि. 23) राह फाऊन्डेशनच्या दरी, अंजनेरी, ब्रह्मगिरी येथील महत्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ.राजेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राह फाऊंडेशन नाशिकमध्ये ४५ लाख झाडांचे वृक्षारोपण करुन त्यांचे संगोपन करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमातंर्गत सुरूवातीच्या टप्प्यात या तीन स्थळांवर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी १ वाजता ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात सहभागी असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची व जल प्रहरींची बैठक नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नाशिक महापालिकेत होईल.
दुपारी ३ ते ५ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या मूख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आयोजित केलेल्या टॅंकरमुक्त नाशिक या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह पर्यावरण कार्यकर्त्यांशी संवाद साधतील,अशी माहिती नमामी गोदा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित (Rajesh Pandit) यांनी दिली.