रेल्वेस्थानकात वाढले मजुरांचे लोंढे

कोविड स्पेशल रेल्वे सोडण्याची मागणी
रेल्वेस्थानकात वाढले मजुरांचे लोंढे

नाशिकरोड । प्रतिनिधी

करोनाचा संसर्ग नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे राज्यात केव्हाही लॉकडाउन होईल या भितीने नाशिकमधील परप्रांतिय मजुरांनी रेल्वेने गावी जाण्यास सुरुवात केली आहे. ही गर्दी वाढू लागल्याने कोविड स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी होत आहे. तथापी, भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी राज्य सरकारने नवीन ट्रेनची मागणी केली तरच तसा विचार करु, असे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून गर्दी करु नये, कर्न्फम तिकीटाशिवाय प्रवास करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नाशिकमध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, पश्चिम बंगाल, तसेच उत्तर महाराष्ट्रातील मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. सातपूर, अंबड व जिल्ह्यातील एमआयडीसींबरोबरच हॉटेल, बांधकाम क्षेत्रात ते काम करतात. मागील लॉकडाउनमध्ये या मजूरांचे मोठे हाल झाले होते. रेल्वे बंद झाल्यामुळे अनेकांनी पायीच गावाकडे कूच केले होते. आताही तशीच परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे असल्याने या मजूरांची कुटुंबासह रेल्वेस्थानकात गर्दी होऊ लागली आहे.

सध्या लांब पल्ल्याच्या स्पेशल ट्रेन सुरु आहेत. नियमाप्रमाणे रिझर्व्हेशन करावे लागते तसेच दोन तास आधी रेल्वेस्थानकावर दाखल व्हावे लागते. रिझर्व्हेशन खिडकीवर गर्दी वाढू लागली आहे. रेल्वेच्या अनेक कर्मचार्‍यांना करोना झाल्यामुळे आणि त्यातच गर्दी वाढू लागल्याने कामाचा ताण वाढला आहे. गर्दीवर नियंत्रणासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि रेल्वे पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

वेळीच खबरदारी

उद्योग व्यवसायावर बंधने आल्यामुळे अनेक मालक काम देण्याच्या स्थितीत नाहीत. कानपूरचे मूळ रहिवासी असलेले आणि नाशिकमध्ये कूक म्हणून काम करणारे रोशनकुमार सिंग म्हणाले की, पत्नी आणि तीन मुले तसेच भावाच्या कुटुंबाला घेऊन मी गावी निघालो आहे. भाऊ येथेच राहणार आहे.

लॉकडाउन लागले तर राहण्या-खाण्याचे हाल होऊ नये म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. बांधकाम मजूर अनुराग सिंग म्हणाला की, परिस्थिती आताच चांगली आहे. ती बिघडण्याच्या आधीच कुटुंबासह गावी जाण्याचे ठरवले आहे. तेथे छोटा-मोठा रोजगार-व्यवसाय करुन जगता तरी येईल. पश्चिम बंगालचे अमित दास मजूर म्हणाला की, गेल्या लॉकडाउनमध्ये मालकाने रेल्वे सुरु होईपर्यंत जेवण व राहण्याची सोय केली होती. कालांतराने नाशिकला आम्ही परत आलो. आता परिस्थिती पुन्हा खालावल्याने मालकानेच गावी जाण्याचा सल्ला दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com