
नाशिक । प्रतिनिधी Nashik
नववर्षाचा पहिला सण संक्रांत (Makarsankranti Festival )तिळगुळाने साजरा होत आहे. वर्षभर गोड बोलण्याचा गुण्यागोविंदाने नांंदण्याचा संदेश या निमित्ताने दिला जाणार आहे. तीळगुळ, वाण व पतंग विेक्रेत्यांनी रविवार कारंजा, मेनरोड, दहीपूलसह उपनगरांतील दुकांने सजली आहेत. खरेदीमुळे बाजारात ग्राहकांंचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसत आहे.
संक्रांती म्हणजे सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो. दरवर्षी न चुकता 14 जानेवारीलाच साजरी होणारी संंक्रांत यंदा लीप वर्ष असल्याने यंदा ती रविवारी (दि. 15) साजरी होणार आहे. यंदाची संक्रांत वाघावर आरुढ आहे. उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. केशराचा टिळा लावला आहे. जाईचे फूल हाती आहे. सर्प जातीची आहे. कुमारिका आहे. तिचे भोजनपात्र चांदीचे असून ती पायस भक्षण करीत आहे. तिचे नाव राक्षसी व नक्षत्रनाव मंदाकिनी आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे. ईशान्येकडे पाहत आहे, असे पंचागात म्हटले आहे. यंदा संक्रातीच्या आदला दिवस भोगीचा आज 14 जानेवारी रोजी साजरा होत आहे.
संक्रांतीच्या पर्वकाळात कठोर बोलू नये, भांडू नये, हा स्नेहवर्धनाचा काळ आहेे. संबंध ताणले गेले असल्यास तीळगुळ देऊन माफ करावे. नात्यातील स्नेह, गोडवा वाढवला जाणार आहे. नवविवाहितेच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी व हलव्याचे दागिने भेट दिली जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त त्यालाही काळ्या रंगाचे कपडे व हलव्याचे दागिने घातले जातात. त्यामुळे या वस्तूंची खरेदी संक्रांतीला हमख़ास होते.
हलव्याचे तयार दागिनेही बाजारात उपलब्ध झाले असून त्यात हार, नेकलेस, कानातले, बिंदी, बांगड्या, कंबरपट्टा, बाजूबंद, मंगळसूत्र, कानाचे वेल, मुकूट असे अनेक प्रकार आहेत. हल्ली तयार लाडू मिळत असले तरी घरच्या तिळगुळाच्या लाडुची व तिळपोळीची गोडी कायम आहे. त्यासाठी घरोघरी महिलांची लगबग सुरु झाली आहे.
संक्रांतीच्या निमित्ताने वाण खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग दिसत आहे. संक्रांतीला काळ्या रंगाच्या वस्त्रांचे महत्त्व असल्याने काळी वस्त्रे खरेदी केली जात आहे. काळ्या वस्त्रांवर साजेशी ज्वेलरी खरेदी करण्याकडे महिलांचा कल आहे. वाण व पतंग विक्रेत्यांनी रविवार कारंजा, मेनरोड, दहीपूलसह उपनगरांतील दुकाने गजबजली आहे. खरेदीमुळे बाजारात ग्राहकांंचा उत्साह ओसंडून वाहतांना दिसत आहे.